---Advertisement---

व्हिडिओ: २१ वर्षांपूर्वी सचिनने केलेल्या ‘त्या’ शतकाने सर्वांना केले होते भावनिक

---Advertisement---

२३ मे १९९९ ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १९९९ च्या विश्वचषकात केनियाविरुद्ध नाबाद १४० धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाचा उचलला होता. त्याचे हे शतक वैयक्तिकरित्या त्याच्यासाठी भावनिक होते. तसेच भारतासाठी महत्त्वाचे होते.

१९९९ चा विश्वचषक इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या विश्वचषकाची सुरुवात भारतासाठी खास झाली नव्हती. पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्विकारावा लागला होता. यानंतर भारताचा पुढचा सामना झिम्बाम्वे विरुद्ध होणार होता.

पण त्या सामन्याच्या आधी भारताचा प्रमुख फलंदाज असलेल्या सचिनला त्याच्या वडीलांच्या निधनाची वाईट बातमी मिळाली. त्यामुळे तो लगेचच वडीलांच्या अंत्यविधीसाठी भारतात परतला. त्यामुळे भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्धचा सामना सचिन शिवाय खेळावा लागला होता. त्या सामन्यातही भारताला केवळ ३ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.

त्यामुळे भारतीय संघासाठी पुढील केनिया विरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. त्यातच सचिन भारतात होता. पण सचिनने परत विश्वचषकात खेळण्यासाठी इंग्लंडला परतण्याचा निर्णय घेतला. सचिन केनिया विरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघात सामील झाला. २३ मे १९९९ ला ब्रिस्टोल येथे केनिया विरुद्ध भारत संघात सामना होता.

त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा भारतीय संघ ९२ धावांवर २ बाद अशा परिस्थितीत असताना सचिन मैदानात आला. त्याच्या साथीला राहुल द्रविड होता. त्या दोघांनी भारतीय संघाचा डाव सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यावेळी शेवटपर्यंत फलंदाजी केली. त्या दोघांनी त्या सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी नाबाद २३७ धावांची भागीदारी केली. त्या दोघांनीही शतकी खेळी केली.

सचिनने पहिल्या ५० धावा ५४ चेंडूत केल्या तर पुढील धावा त्याने केवळ ४७ चेंडूत केल्या. त्याने केवळ ८४ चेंडूत त्याच्या शतकाला गवसणी घातली होती. हे त्याचे २२ वे वनडे शतक होते. जेव्हा त्याने त्याचे शतक पूर्ण केले त्यावेळी त्याने आकाशाकडे पाहत बॅट उंचावली होती. त्याने हे शतक करत केवळ भारतीय संघालाच मदत केली नव्हती तर त्याच्या वडीलांना आदरांजलीही वाहिली होती. त्याने हे शतक त्याच्या वडीलांना समर्पित केले होते.

सचिनने त्याचे शतक पूर्ण केल्यावर पुढील १७ चेंडूत ४० धावा केल्या होत्या. त्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारत भारताला ३२९ धावांपर्यंत पोहचवले होते. त्याला १०४ धावा करत द्रविडने भक्कम साथ दिली.

त्यानंतर ३३० धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीसाठी उतरलेल्या केनियाला ५० षटकात ७ बाद २३५ धावाच करता आल्या. त्यामुळे भारतीय संघ या महत्त्वाच्या सामन्यात ९४ धावांनी विजयी ठरला. गोलंदाजी करताना देबाशिष मोहंतीची कामगिरी चमकदार झाली. त्याने ५६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.

यानंतर भारताने पुढील श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्धचे सामने जिंकत सुपर सिक्स फेरीत प्रवेश केला होता. पण सुपर सिक्समध्ये भारताला केवळ १ विजय मिळवता आल्याने भारताचे त्या विश्वचषकातील आव्हान संपले. पण असे असले तरी सचिनची केनियाविरुद्ध केलेली भावनिक शतकी खेळी सर्वांच्याच आठवणीत राहिली.

ट्रेंडिंग लेख –

‘फलंदाज’ म्हणून गोलंदाजांनी केले ‘हे’ ५ जागतिक विक्रम; भारताचा खेळाडूही यादीत

त्याचे प्रत्येक ‘शतक’ म्हणजे इतिहास; पाहा कॅप्टन कुल धोनीची आंतरराष्ट्रीय शतके

कसोटीत वेगवान त्रिशतक करणारे ५ क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---