fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कसोटीत वेगवान त्रिशतक करणारे ५ क्रिकेटपटू

Top 5 Fastest Triple Centuries In Test Cricket

क्रिकेट इतिहासात कसोटीचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे. कसोटी क्रिकेट खेळताना खेळाडूच्या मानसिकतेची आणि कौशल्याची परिक्षा पाहिली जाते. अशा वेळी कसोटीत त्रिशतक करणे तसे कठीणच, पण आत्तापर्यंत एकूण २७ खेळाडूंनी त्रिशतके केली आहेत. त्यातील केवळ ४ खेळाडूंनाच कसोटीत २ वेळा त्रिशतक करता आली आहेत. अन्य २३ खेळाडूंनी प्रत्येकी १ वेळा त्रिशतक केले आहे.

तसेच कसोटी हा क्रिकेट प्रकारातील सर्वात धीमा प्रकार मानला जातो. पण असे असले तरी काही फलंदाज असे आहेत ज्यांनी कसोटीतही आक्रमक खेळी केल्या आहेत. या लेखात अशा ५ फलंदाजांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यांनी कसोटीत वेगवान त्रिशतके केली आहेत.

कसोटीत जलद त्रिशतकी खेळी करणारे ५ फलंदाज – 

५. डेव्हिड वॉर्नर – ३८९ चेंडू

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील ऍडलेड कसोटीत त्रिशतकी खेळी केली होती. तो सामना दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने वॉर्नर अझर अलीनंतर दिवस-रात्र कसोटीत त्रिशतक करणारा दुसराच क्रिकेटपटू ठरला होता.

वॉर्नरने ही खेळी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात केली होती. त्यावेळी त्याने ३८९ चेंडूंचा सामना करत ३०० धावा पूर्ण केला होता. त्या डावात वॉर्नरने एकूण ४१८ चेंडूत नाबाद ३३५ धावा करताना ३९ चौकार आणि १ षटकार मारला आहे. यामुळे तो ऑस्ट्रेलियाकडून कसोटी सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा मॅथ्यू हेडननंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन आणि मार्क टेलर यांच्या ३३४ धावांच्या विक्रमाला मागे टाकले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ३ बाद ५८९ धावांवर घोषित केला. यावेळी पाकिस्तानला पहिल्या डावात ३०२ धावा करता आल्या. पण तरीही पाकिस्तान २८७ धावांची पिछाडीवर असल्याने पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात पाकिस्तानला २३९ धावाच करता आल्याने ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि ४८ धावांनी विजय मिळवला.

४. करुण नायर – ३८१ चेंडू

२८ वर्षीय करुण नायर हा भारताकडून कसोटीत त्रिशतक करणारा विरेंद्र सेहवागनंतरचा केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे. त्याने केवळ त्याचा तिसरा कसोटी सामना खेळताना हा कारनामा केला होता. त्याने २०१६ ला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून कसोटीत पदार्पण केले होते. याच मालिकेत त्याने चेन्नई कसोटीत नाबाद ३०३ धावांची खेळी केली होती.

त्याने हे त्रिशतक ३८१ चेंडूत पूर्ण केले होते. हे त्रिशतक भारताचा पहिल्या डावात त्याने केले होते. त्याच्या त्रिशतकानंतर भारताने ७५९ धावांवर डाव घोषित केला होता. त्यामुळे भारताने त्या सामन्यात २८२ धावांची आघाडी घेतली होती.

तत्पूर्वी त्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४७७ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडला दुसऱ्या डावात २०७ धावाच करता आल्याने भारताने हा सामना १ डाव आणि ७५ धावांनी जिंकला होता.

३. विरेंद्र सेहवाग – ३६४ चेंडू

भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग भारताकडून त्रिशतक करणारा पहिला क्रिकेटपटू आहे. त्याने हे पहिले त्रिशतक मार्च २००४ ला पाकिस्तानविरुद्ध मुल्तानमध्ये केले होते. त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून सेहवागने पहिल्या डावात हे त्रिशतक केले होते.

त्याने शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या सक्लेन मुश्ताकच्या चेंडूवर षटकार मारत त्याचे पहिले कसोटी त्रिशतक अवघ्या ३६४ चेंडूतच साजरे केले. त्याने त्या सामन्यात ३७५ चेंडूत ३०९ धावा केल्या. या खेळीत त्याने ३४ चौकार आणि ६ षटकार मारले.

तसेच त्याच डावात सचिनने १९४ धावांची खेळी केली होती. या दोघांच्या खेळीमुळे भारताने पहिला डाव ६७५ धावांवर घोषित केला. पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद ४०७ धावा केल्या. परंतू २६८ धावांनी पिछाडीवर असल्याने त्यांना भारताने फॉलोऑन दिला. पाकिस्तानचा दुसरा डाव २१६ धावांवरच संपुष्टात आल्याने हा सामना भारताने १ डाव आणि ५२ धावांनी जिंकला होता.

२. मॅथ्यू हेडन – ३६२ चेंडू

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे. त्याने ऑक्टोबर २००३ ला झिम्बाब्वे विरुद्ध पर्थ येथे खेळताना पहिल्या डावात त्रिशतक केले होते. त्यावेळी त्याने केवळ ३६२ चेंडूत त्रिशतकाला गवसणी घातली होती. त्या डावात त्याने एकूण ४३७ चेंडूत ३८ चौकार आणि ११ षटकारांसह ३८० धावा केल्या होत्या.

त्याच्या त्रिशतकाच्या आणि नंतर ऍडम गिलख्रिस्टने केलेल्या ११३ धावांच्या खेळीच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ७३५ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या झिम्बाब्वेला पहिल्या डावात सर्वबाद २३९ धावाच करता आल्या. त्यामुळे ते ४९६ धावांनी पिछाडीवर पडले. ऑस्ट्रेलियाने त्यांना फॉलोऑन दिला.

दुसऱ्या डावात झिम्बाब्वेला ३२१ धावाच करता आल्याने हा सामना ऑस्ट्रेलियाने १ डाव आणि १७५ धावांनी जिंकला होता.

१. विरेंद्र सेहवाग – २७८ चेंडू 

कसोटीतील पहिले त्रिशक केल्यानंतर बरोबर ४ वर्षांनी सेहवागने कसोटीतील दुसरे त्रिशतक केले. २००८ ला २६ मार्चपासून चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना सुरु झाला होता.या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली. त्यांचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी ५४० धावांवर संपला.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या सेहवागने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाखेर तो ५२ धावांवर नाबाद होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी(२८ मार्च) त्याने २७८ चेंडूत त्याचे कसोटीतील दुसरे त्रिशतक पूर्ण केले. त्यावेळी तो कसोटीमध्ये सर्वात जलद त्रिशतक करणारा फलंदाज ठरला होता. आजही हा विक्रम त्याच्या नावावर आहे.

तिसऱ्या दिवशी तो ३०९ धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर चौथ्या दिवशी(२९ मार्च) तो ३०४ चेंडूत ३१९ धावा केल्यानंतर बाद झाला. त्याने या खेळीत ४२ चौकार आणि ५ षटकार मारले होते. त्याचबरोबर या डावात द्रविडनेही १११ धावांची शतकी खेळी केली होती. त्यामुळे भारताने सेहवाग आणि द्रविडच्या खेळींच्या जोरावर ६२७ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिका संघ ५ बाद ३३१ धावांवर असताना पाचव्या दिवसाचा खेळ संपल्याने हा सामना अनिर्णित राहिला.

ट्रेंडिंग लेख  –

क्रिकेट खेळायचंय तर आयसीसीच्या या ३ कठीण नियमांच करावं लागणार पालन

भविष्यात टीम इंडियाकडून अष्टपैलू म्हणून खेळण्याची क्षमता असलेले ३ खेळाडू

जेलची हवा खावी लागलेले ५ क्रिकेटपटू; दोन नावं आहेत भारतीय

You might also like