fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भविष्यात टीम इंडियाकडून अष्टपैलू म्हणून खेळण्याची क्षमता असलेले ३ खेळाडू

3 cricketers who can make debut as all-rounder for Team India in future

क्रिकेट या खेळात जसे फलंदाजांची आणि गोलंदाजांची भूमीका महत्त्वाची असते तशीच अष्टपैलू क्रिकेटपटूंचीही महत्त्वाची भूमीका असते. अष्टपैलू खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करत असल्याने संघाला समतोल साधून देतात.

आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू होऊन गेले आहेत. भारताकडूनही अनेक चांगले अष्टपैलू क्रिकेटपटू खेळले. ज्यांनी भारताला मोठे विजय मिळवून दिले आहेत. यात युवराज सिंग, कपिल देव अशा अष्टपैलू क्रिकेटपटूंचा समावेश आहे. सध्या भारतीय संघाकडे हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजासारखे अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत. पण पुढील भविष्याचा विचार करता भारतीय संघाला युवा अष्टपैलू क्रिकेटपटूंना घडवण्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

या लेखात अशा 3 खेळाडूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे जे भारतीय संघाकडून भविष्यात अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून खेळू शकतात.

3. श्रेयस गोपाळ –

कर्नाटकचा अष्टपैलू क्रिकेटपटू श्रेयस गोपाळने आत्तापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना अनेकदा चमकदार कामगिरी केली आहे. तो एक चांगला फिरकी गोलंदाज असून त्याच्याकडे फलंदाजीही क्षमता आहे. श्रेयसने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 64 सामन्यात 34.28 च्या सरासरीने 4 शतकांसह 2674 धावा केल्या आहेत. तसेच 191 विकेट्सही घेतल्या आहेत.

त्याचबरोबर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 40 सामन्यात त्याने 22.22 च्या सरासरीने 400 धावा केल्या आहेत. तसेच 64 विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच 26 वर्षीय श्रेयसची आयपीएलमधील कामगिरीही समाधानकारक आहे. त्याने आयपीएलमध्ये 31 सामन्यात 127 धावा केल्या असून 38 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने मागच्यावर्षी आयपीएलमध्ये हॅट्रिकही घेतली आहे.

पण त्याच्यासाठी कमजोर गोष्ट ही त्याचे वय आहे. तो सध्या 26 वर्षांचा असल्याने त्याला जर आणखी काही वर्षे भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी वाट पाहावी लागली तर कदाचित नंतर फार उशीर होऊ शकतो.

2. अभिषेक शर्मा –

19 वर्षीय अभिषेक शर्मा प्रामुख्याने फिरकीपटू असला तरी त्याच्याकडे फलंदाजीची क्षमता आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळत असून त्याने 2018 ला विश्वचषक जिंकणाऱ्या 19 वर्षांखालील भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.

त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2017 ला पदार्पण केले असून आत्तापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यात त्याने 25.57 च्या सरासरीने 2 अर्धशतकांसह 358 धावा केल्या आहेत. तसेच 8 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबर अ दर्जाच्या सामन्यात त्याने 21 सामन्यात 18.94 च्या सरासरीने 360 धावा केल्या असून 5 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच आयपीएलमध्ये त्याने 6 सामने खेळले आहेत. यात त्याने 24 च्या सरासरीने 72 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 1 विकेट घेतली आहे. त्याच्यासाठी सर्वात जमेची बाजू म्हणजे त्याचे वय आहे. त्याने आणखी मेहनत घेतली तर त्याच्यात अष्टपैलू म्हणून वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवण्याची क्षमता आहे.

1. रियान पराग –

आसामचा असलेल्या रियान परागने मागीलवर्षी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे तो प्रकाशझोतात आला होता. त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना काही छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या होत्या. त्याने 7 सामने मागील वर्षी आयपीएलमध्ये खेळले असून 32 च्या सरासरीने 160 धावा केल्या आहेत आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेत 2017 ला आसामकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या रियानने 13 सामन्यात 31.38 च्या सरासरीने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 659 धावा केल्या आहेत. तसेच 14 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याचबरोबर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने 24 सामने खेळले असून 25.76 च्या सरासरीने 3 अर्धशतकांसह 541 धावा केल्या आहेत. तसेच 22 विकेट्सही घेतल्या आहेत.

तसेच अभिषेकप्रमाणे रियानसाठी त्याचे वय त्याची जमेची बाजू आहे. तो सध्या केवळ 18 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याने पुढे त्याच्या कामगिरीत सातत्य ठेवले तर त्याच्याकडेही भारतीय संघात स्थान मिळवण्याची क्षमता आहे.

ट्रेंडिंग लेख –

जेलची हवा खावी लागलेले ५ क्रिकेटपटू; दोन नावं आहेत भारतीय

कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारे ३ भारतीय गोलंदाज

पाकिस्तान संघाला वनडेत धु- धु धुणारे ३ भारतीय क्रिकेटर्स

You might also like