---Advertisement---

अफलातून! सानिया मिर्झाने २० महिन्यांनंतर पटकावले डब्ल्यूटीएचे विजेतेपद, ओस्ट्रावा ओपनमध्ये मिळवले यश

On: सोमवार, सप्टेंबर 27, 2021 9:13 PM
---Advertisement---

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने रविवारी (२६ सप्टेंबर) या हंगामातील तिचे पहिले विजेतेपद पटकावले आहे. सानियाने या हंगामात ओस्ट्रावा ओपनमध्ये महिला दुहेरीचा अंतिम सामना जिंकून आपले खाते उघडले आहे. सानियाने तिची चीनची जोडीदार शुई झांगसह हे विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेत द्वितीय क्रमांकाच्या सानिया आणि झांग या जोडीने एक तास आणि चार मिनिटे चाललेल्या सामन्यात, अमेरिकेच्या ख्रिस्तियन आणि न्यूझीलंडच्या रोटलिफ या तिसऱ्या मानांकित जोडीविरुद्ध ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला.

या मोसमात सानियाने दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मागील महिन्यात सानियाने अमेरिकेत झालेल्या डब्ल्यूटीए २५० क्लीव्हलँड स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. सानिया आणि तिची साथीदार चिर्स्टीना मचालेसह या स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. मात्र, त्यांना अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना उपविजेता म्हणून गौरविण्यात आले होते.

सानियाने २० महिन्यांनंतर जेतेपद पटकावले
तत्पूर्वी, ३४ वर्षीय सानिया मिर्झाने २० महिन्यांनंतर डब्ल्यूटीए जेतेपद पटकावले आहे. तिने जानेवारी २०२० मध्ये होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. रविवारी ओस्ट्रावा ओपनमधील विजयासह सानियाच्या दुहेरीच्या जेतेपदाचा आकडा ४३ वर पोहोचला आहे.

सानिया आणि झांगने जपानच्या इरी होझुमी आणि मकोतो निनोमिया या चौथ्या मानांकित जोडीला ओस्ट्रावा ओपनच्या उपांत्य फेरीत ६-२, ७-५ ने पराभूत केले होते. त्यानंतर अंतिम फेरीत शानदार कामगिरी करत जेतेपदावर आपले नाव कोरले.

डब्ल्यूटीए २५० क्लीव्हलँड स्पर्धेचे उपविजेतेपद जिंकल्यानंतर सानियाने आपल्या भाषणात आपल्या आई होण्याबद्दल विचार मांडले होते. तिने म्हटले होते की, ‘आई होणे हा टप्पा ‘स्री’ च्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो, पण त्यामुळे आपण आपली कारकीर्द थांबवता कामा नये. आपल्या यशाने आपल्या मुलांना आपण प्रेरित करू शकतो.’

या भाषणादरम्यान ती आपल्या मुलासोबत टेनिस कोर्टवर आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-
-अलीना शेखला राष्ट्रीय टेनिस स्पर्धेमध्ये उपविजेतेपद
-जोकोविचला पराभूत करताच मेदवेदेवने का केले ‘डेड फिश’ सेलिब्रेशन? स्वत:च केलाय खुलासा
-अंतिम सामन्यात बॅकफूटवर पडलेल्या जोकोविचच्या संयमाचा सुटला बांध, केली ‘नकोशी कृती’- VIDEO

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---