भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने आत्तापर्यंत मोठी यशाची शिखरे पार केली आहेत. भारतात टेनिसमध्ये कारकिर्द घडवणाऱ्या अनेकांसाठी ती आदर्श आहे. पण एक वेळ अशी होती की तिला निराशेने ग्रासले होते.
एका ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. सानिया 2008 साली बीजिंग ऑलिम्पिकमधून मनगटाच्या दुखापतीमुळे बाहेर पडली होती. ती स्पर्धेतून बाहेर पडल्याने नैराश्यात गेली होती. सानिया दुखापतीमुळे जवळपास एक वर्षासाठी टेनिस कोर्टपासून दूर राहिली होती. सानिया म्हणाली की, या दुखापतीनंतर ती मानसिकरित्या खूपच अस्वस्थ झाली होती.
युट्यूब चॅनल माइंड मॅटर्सला दिलेल्या मुलाखतीत सानिया म्हणाली, “मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे मला 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमधून माघार घ्यावी लागली होती. मी 3 ते 4 महिने नैराश्यात गेली होती. मला आठवते की मी विनाकारणच रडत बसायचे. मी बरी असतानाच काही वेळातच माझ्या डोळ्यांतून अश्रू येत असत. मला आठवते की मी महिनाभर जेवण करण्यासाठी खोलीबाहेर आले नाही.”
सानिया म्हणाले की, ‘मला असे वाटले की मी पुन्हा कधीही टेनिस खेळू शकणार नाही. वयाच्या 20 व्या वर्षी एका खेळाडूसाठी हा मोठा धक्का असतो.’
मनगटाला दुखापत झाल्यानंतर सानियावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यावेळी तिच्या कुटुंबीयांनी तिला फार पाठिंबा आणि प्रोत्साहित केले. सानियाने पुन्हा 1 वर्षानंतर पुनरागमन केले आणि त्याचवर्षी झालेल्या राष्ट्रकुल खेळामध्ये तिने दोन पदके जिंकली होती. सानिया हे आज भारतीय टेनिस जगातील एक मोठे नाव असून, अनेक तरुण खेळाडू तिला आदर्श मानतात.
महत्त्वाच्या बातम्या –
जाळ अन् धूर संगटच! टॅलेंटची खाण आहे ‘या’ क्रिकेटपटूची बायको; पटकावलाय मिस वर्ल्ड ऑस्ट्रेलियाचा किताब
दिग्गज क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यात ‘हे’ ५ भारतीय खेळाडू करु शकतात पदार्पण