भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. अशात काही भारतीय फलंदाज गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा कसोटीचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे. राहणेच्या खराब फॉर्ममुळे त्याला सतत मिळणाऱ्या संधींवर अनेक दिग्गजांनी सवाल उठवला होता. त्यातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी देखील राहणेवर निशाणा साधला आहे. याबाबत मांजरेकर यांनी स्वतःचे आणि राहुल द्रविडचे उदाहरण देखील दिले.
आतापर्यंत झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ४ कसोटी सामन्यात रहाणेचे म्हणावे तसे प्रदर्शन राहिले नाही. म्हणून त्याला संघातून वगळण्याची मागणी केली जात होती. मात्र तरीही भारतीय व्यवस्थापकांनी राहणेवर विश्वास दाखवत त्याला चारही कसोटी सामन्यात खेळायला संधी दिली.
याबाबत संजय मांजरेकर यांनी स्वतःचे उदाहरण देत सोनी स्पोर्ट्स नेटवर्क सोबत बोलताना म्हणाला, “जे खेळाडू बेंचवर बसले आहेत, त्यांना घेऊन तुमच्या मनात एक वेगळा संभ्रम आहे. परंतु, विचार करा जर मला तेव्हा ड्रॉप केले नसते, तर राहुल द्रविडसह अन्य दिग्गज खेळाडू समोर आले नसते.”
द्रविड आणि सौरव गांगुली यांनी १९९६ च्या इंग्लंड दौऱ्यातून लॉर्ड्स येथे कसोटी पदार्पणाची संधी मिळाली होती. त्यावेळी मांजरेकर खेळले नव्हते.
राहणेने आतापर्यंत केवळ लॉर्ड्सच्या मैदानातच अर्धशतकी खेळी करत, ६१ धावा केल्या होत्या. तीच त्याची या मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. अशात रहाणे या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यामुळे रहाणे ऐवजी संघात हनुमा विहारी किंवा सूर्यकुमार यादव यांना संधी मिळाली पाहिजे असेही मत मांजरेकर यांनी व्यक्त केले.
यावर बोलताना ते म्हणाले, “आधी हनुमा विहारी बेंचवर बसून आहे. त्यानंतर सूर्यकुमार देखील रिझर्व खेळाडू म्हणून बेंचवर बसून आहे. त्यामुळे तुम्ही या खेळाडूंच्या खेळाबाबत तेवढे जाणून नाही आहात. तर दुसरीकडे अजिंक्य रहाणे सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे.”
दरम्यान, याआधी अजिंक्य रहाणेच्या खराब फॉर्मशी संबंधित संघाचे फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी देखील वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी रहाणेचा फॉर्म सध्या संघासाठी चिंतेचा विषय असल्याचे सांगितले होते. त्यांच्या मते अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या खराब काळातून जात आहे. मात्र संघ यावर जास्त चिंतीत नाही.
यावर भारतीय संघ अशी आशा व्यक्त करत आहे की लवकरच रहाणेचा चांगला फॉर्म येईल. तसेच राठोड यांनी शुक्रवारी (१० सप्टेंबर) मॅंचेस्टर येथे सुरू होणाऱ्या ५ व्या कसोटी सामन्यात देखील रहाणेला संधी मिळण्याचे संकेत दिले होते.
दरम्यान आतापर्यंत झालेल्या ४ कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले. ज्यामुळे या मालिकेत भारतीय संघ सध्या २-१ ने आघाडीवर आहे. पुढचा कसोटी सामना मॅंचेस्टरच्या मैदानात १० सप्टेंबरपासून खेळविण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–दे घुमा के! हार्दिक परतला जुन्या रंगात, सराव सत्रात ठोकला खणखणीत ‘हेलिकॉप्टर शॉट’
–कसोटी क्रमवारी: रोहित-विराट यांच्यातील गुणांचा फरक वाढला; शार्दुल, बुमराहला फायदा
–ओव्हलवरील ऐतिहासिक विजयानंतरही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ २ बदलांंची आवश्यकता