दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी (Second Test) सामन्यात बरेच वाद पाहायला मिळाले आहेत. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावादरम्यान जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को जेन्सन (Marco Jansen) यांच्यात विवाद (Controversy Between Bumrah And Jansen) झाल्याचे पाहायला मिळाले. यावर आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मांजरेकरांचे म्हणणे आहे की, सर्वांना बुमराहचे हे रूपसुद्धा पाहायला मिळाले आहे. पण मला त्याची ही बाजू अजिबात पाहायला आवडत नाही.
नक्की काय झाले होते?
त्याचे झाले होते असे की, भारताच्या दुसऱ्या डावादरम्यान बुमराह दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला होता. यावेळी ५४ वे षटक टाकण्यासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज जेन्सन आला होता. त्याने पुढे तळातील फलंदाज फलंदाजी करत असतानाही १२० किमी दर ताशीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली. यावर बुमराहला फटके मारण्यास अडचण येत होती.
जेन्सनच्या षटकातील तिसरा चेंडू तर बुमराहच्या खांद्याला लागून गेला. यानंतर तो बुमराहकडे डोळे वटारून पाहू लागला. यावर बुमराहने शाब्दिक प्रतिक्रिया न देता आपल्या हाताने खांद्यावरची धूळ झटकत असल्याची कृती केली होती.
यावरून चिडलेल्या जेन्सनने पुढे असा काही चेंडू फेकला, ज्यावर पुन्हा बुमराहला एकही धाव घेता आली नाही. हा चेंडू टाकल्यानंतर जेन्सन पुन्हा रागाने बुमराहकडे पाहत काहीतरी बोलू लागला. हे बघून बुमराहचाही पारा चढला आणि तो जेन्सनला इकडे ये असा इशारा करत त्याच्या दिशेने गेला. जेन्सननेही पुढे माघार घेतली नाही आणि दोघांमध्ये भर मैदानात वाग्युद्ध रंगले. मात्र त्वरित मैदानी पंचांनी दोघांना शांत केल्याने हा विवादच लवकरच मिटला.
बुमराहने स्मितहास्यासह उत्तर द्यायला पाहिजे होते- मांजरेकर
बुमराह-जेन्सन विवादाविषयी बोलताना मांजरेकर म्हणाले की, ही खूप रोमांचक गोष्ट आहे. इंग्लंडमध्येही बुमराहसोबत असे झाले होते. पण मला बुमराहची ही बाजू अजिबात आवडत नाही. मला त्याची ही बाजू पाहायची नाही. याउलट जेव्हा वातावरण खूप तापते, पण बुमराह मात्र त्या परिस्थितीला फक्त आपल्या चेहऱ्यावरील हास्यासह उत्तर देतो, ते खूप शानदार असते.
महत्त्वाच्या बातम्या-
पीएमडीटीए मानांकन वरिष्ठ व हौशी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत अमित शर्माला विजेतेपद
‘लॉर्ड’ उपाधी मागील खरे कारण काय? का मिळतंय घवघवीत यश? शार्दुल ठाकूरनेच केलाय खुलासा