भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने आयपीएल 2022 मध्ये अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने 450 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या आणि कर्णधाराच्या रूपात राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचवले. असे असले तरी, टी-20 विश्वचषक 2022 मध्ये त्याला संधी मिळाली नाही. यष्टीरक्षकाच्या रूपात रिषभ पंत टी-20 विश्वचषक आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघासाठी खेळला.
टी-20 विश्वचषकात मिळालेल्या अपयशानंतर भारतीय संघाने न्यूझीलंड दौरा केला. संजू सॅमसन (Sanju Samson) या दौऱ्यात देखील संघासोबत होता, पण त्याला खेळण्याची संधी मात्र मिळाली नाहीये. रिषभ पंत (Rishabh Pant) याला यावेळीही प्लेइंग इलेव्हनमध्ये सॅमसनच्या आधी प्राधान्य मिळाले. असे असले तरी, त्याला संघासाठी अपेक्षित प्रदर्शन मात्र करता आले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या या टी-20 मालिकेत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये पंतने 6 आणि 11 अशा धावा केल्या. तत्पूर्वी मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द केला गेला, तर तिसरा सामना पावसामुळेच बरोबरीवर सोडवला गेला. भारताने न्यूझीलंडविरुद्धची ही टी-20 मालिका 1-0 अशा आघाडीवर जिंकली.
सॅमसनला टी-20 विश्वचषक आणि नंतर न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत संधी न मिळाल्यामुळे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. आयपीएल 2022 मधील प्रदर्शन पाहता सॅमसन पंतपेक्षा चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळते. त्याने आयपीएल 2022 मधील 17 सामन्यांमध्ये 29 च्या सरासरीने 459 धावा केल्या होत्या. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश होता. 55 धावा ही त्याची सर्वात मोठी खेळी होती आणि स्ट्राईक रेट 147 चा होता. यादरम्यान त्याने 43 चौकार आणि 26 षटकारही ठोकले.
दुसरीकडे पंतने यावर्षीचे आयपीएल प्रदर्शन पाहिले, तर त्याने 14 सामन्यांमध्ये 31 च्या सरासरीने 340 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकही अर्धशतक केले नाही आणि 44 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. या धावा करण्यासाठी पंतच्या बॅटमधून 35 चौकार आणि 16 षटकार निघाले. या आकडेवारीवरून समजू शकते की, टी-20 लीगमध्ये पंतपेक्षा सॅमसनने 118 धावा जास्त केल्या आहेत. पण टी-20 विश्वचषकाच्या संघात त्याला तरीही संधी मिळाली नाही.
या दोघांपेक्षा विश्वचषकात जास्त चर्चेता राहिला तो म्हणजे दिनेश कार्तिक. आरसीबीसाठी खेळणाऱ्या 37 वर्षीय कार्तिकने आयपीएलच्या मागच्या हंगामात 16 सामन्यांमध्ये 55 च्या सरासरीने 330 धावा केल्या. या अप्रतिम प्रदर्शनानंतर कार्तिकला टी-20 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली, पण त्याने चांगलीच निराशा केली. विश्वचषकानंतर कार्तिकसाठी भारतीय संघासाठी दारे बंद झाली असे बोलले जात आहे. (Sanju Samson did better than Rishabh Pant in the IPL, but he didn’t get a chance in the series against New Zealand.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ना पत्नी नताशा ना मुलगा अगस्त्य; हार्दिकच्या यशाचे सिक्रेट आहे ही खास व्यक्ती
‘आता पंतला हाकलण्याची वेळ आलीये’, रिषभच्या फ्लॉप प्रदर्शनानंतर चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया