युवा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्याचे दिसून आले. आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांपैकी त्यांना अवघ्या २ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. शनिवारी (२४ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानने ६ गडी राखून बाजी मारत हंगामातील दुसरा विजय नोंदवला. या विजयानंतर कर्णधार सॅमसनने ख्रिस मॉरिसबद्दल मोठे भाष्य केले आहे.
या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत राजस्थान संघाच्या गोलंदाजांनी कोलकाता संघाचा डाव १३३ धावातच संपुष्टात आणला होता. तसेच मॉरिसने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत ४ गडी बाद केले होते. ४ षटके गोलंदाजी करताना २३ धावा देत त्याने ही कामगिरी केली होती.
या कामगिरीची दखल घेत सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत सॅमसनने म्हटले की, “मॉरिस एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. संघातील अनुभवी आणि युवा गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी करत आहेत .मी त्यांचे नेतृत्व करत असल्याचा आनंद घेत आहे. मला असे वाटते की, ख्रिस मॉरिसला मोठ्या फलंदाजांना बाद करताना स्पर्धा हवी होती. माझी विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मी मैदानावर येण्यापूर्वी विचार करत नाही. मला फक्त माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायला आवडतं. परंतु आता मला परिस्थितीला अनुसरून फलंदाजी करायची आहे. मला माझ्या संघाला सामने जिंकून द्यायचे आहेत.”
सामनावीर पुरस्कार स्विकारल्यानंतर ख्रिस मॉरिस म्हणाला…
या सामन्यात ४ गडी बाद करत कोलकाता संघाच्या फलंदाजी क्रमाचे कंबरडे मोडणाऱ्या मॉरिसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर तो म्हणाला, “एक स्पष्ट मन माझ्यासाठी कार्य करते. तुम्ही दोन्ही डावात पाहिलं असेल, आजची (२४ एप्रिल) खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी सोपी नव्हती. तसेच स्टोक्स, आर्चर आणि लिविंगस्टोनच्या जाण्याने संघाला मोठा फटका बसला आहे. परंतु अजूनही आमच्याकडे एक योग्य व्यक्ती आहे. मी त्याचे नाव नाही सांगू शकत.”
राजस्थान संघ लढा देत राहणार
राजस्थान संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर पुढील २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता त्यांनी जोरदार पुनरागमन केले आहे. याबाबत बोलताना मॉरिस म्हणाला, “मला वाटते की, परिस्थिती बदलली आणि आंद्रे रसल विरुद्ध खेळणे सोपे नसते. जसे की मी म्हटले, त्याने गेल्या सामन्यात तुफान फलंदाजी केली होती. त्याच्याविरुद्ध खेळण्याचा अनुभव माझ्या कामी आला होता. मला आशा आहे या संघातून आणखी खूप काही बाहेर येणं बाकी आहे. आम्ही लढा देत आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या-
कमिन्सचा जोरदार बाउन्सर आदळला बटलरच्या हेल्मेटवर, थांबवावा लागला सामना; पाहा तो क्षण
‘चेन्नईची खेळपट्टी बकवास’, राजस्थानच्या खेळाडूने उघडपणे व्यक्त केली नाराजी






