भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. हार्दिक पांड्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि उत्कृष्ट गोलंदाजीने संघामध्ये स्थान मिळविले. त्याचबरोबर भारतीय संघाने त्यांच्या खेळीचा लाभ देखील उचलला. कारण हार्दिक पांड्याने संघातील एक जास्तीचा फलंदाज किंवा गोलंदाज या दोन्ही भूमिका निभावल्या आहेत. परंतु हार्दिक पांड्याला मागील दोन वर्षापासून पाठीच्या दुखापतीमुळे उत्कृष्ट कामगिरी करता आली नाही. परंतु आता हार्दिक पांड्या फलंदाज म्हणून संघात पुनरागमन करणार आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघात आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी खेळतो.
गेले काही दिवस पाठीच्या दुखापतीमुळे पांड्या अधिक षटके गोलंदाजी करु शकत नाही आहे. त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड करण्यासाठी भारतीय संघ धडपडत आहे. आता त्याच्या पर्याय म्हणून माजी निवडकर्ते सरनदीप सिंग यांनी शार्दुल ठाकूरचा पर्याय सुचवला आहे. शार्दुल ठाकूर एक वेगवान गोलंदाज असून त्याच्याकडे उपयुक्त फलंदाजी करण्याची देखील क्षमता आहे. अलीकडेच भारताने त्याला त्यांच्या सेटअपमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, या वर्षाच्या सुरूवातीस ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी करूनही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याची निवड झाली नव्हती.
जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताचा पराभव केला. अशा परिस्थितीत शार्दुल ठाकूर जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारताच्या 15 सदस्यांच्या संघात असायला हवा होता, असे माजी निवडकर्ते सरनदीप सिंग यांचे मत आहे.
सरनदीप सिंग यांनी सांगितले की, “शार्दुलसारखा वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून काम करण्याची वेळ आली आहे, कारण हार्दिक पांड्या यापुढे फॉर्मेटमध्ये गोलंदाजी करू शकत. संघ फक्त हार्दिकवर अवलंबून राहू शकत नाही. पांड्या सर्व फॉर्मेटमध्ये गोलंदाजीसाठी कधी तंदुरुस्त होईल हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे शार्दुलसारख्या एखादा खेळाडू तयार करणे आवश्यक आहे किंवा विजय शंकर किंवा शिवम दुबे देखील पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.”
परंतु हार्दिक पांड्याला अशी आशा आहे की, तो टी20 विश्वचषकच्या अगोदर गोलंदाजीसाठी तंदुरुस्त होईल. एका संकेतस्थळाशी बोलताना तो म्हणाला होता की, “मला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून प्रत्येक सामन्यात गोलंदाजी करायची आहे. मी स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि मला कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकात गोलंदाजीपासून दूर रहायचे नाही. माझे पूर्ण लक्ष टी20 विश्वचषकावर आहे.” हार्दिक पांड्याची 2019 मध्ये कंबरेची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने जास्त गोलंदाजी केली नाही. आयपीएलच्या या हंगामात देखील पांड्याने एकही चेंडू टाकला नाही. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघ त्याचा पर्याय शोधेल, हे जवळपास निश्चित आहे.
महत्वाच्या बातम्या:
बाजीगर! गोष्ट पाच तासांत तीन सुवर्ण जिंकणाऱ्या दीपिका कुमारीची
देशाचे दुर्दैव! आशियाई सुवर्णपदक विजेता खेळाडू विकतोय चहा
गार्डनमध्ये रोहितनं केली आपल्या चिमुकलीसह मस्ती; सोबतच दिसली समायराची गोंडस मैत्रीण






