इराणी कप 2024 मध्ये मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानचा जलवा पाहायला मिळतोय. या 26 वर्षीय फलंदाजानं ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाविरुद्ध शानदार द्विशतक झळकावलं.
विशेष म्हणजे, या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतासाठी पदार्पण करणाऱ्या सरफराजला बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत बेंचवर बसावं लागलं होतं. या मालिकेसाठी विराट कोहली, रिषभ पंत आणि केएल राहुलच्या पुनरागमनामुळे त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. मात्र आता न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी सरफराजनं द्विशतक ठोकून निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढवली आहे.
सरफराज खाननं प्रथम कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत मोर्चा सांभाळला आणि संघाला 250 धावांच्या पुढे नेलं. रहाणेचं शतक थोडक्यात हुकलं. तो 97 धावा करून बाद झाला. मात्र सरफराज खेळत राहिला. त्यानं 149 चेंडूत शतक पूर्ण केलं. यानंतर त्यानं वेग वाढवला. सरफराजनं 253 चेंडूत द्विशतक पूर्ण केलं. आपल्या या खेळीत त्यानं 23 चौकार आणि 3 षटकार लगावले.
या खेळीसह सरफराज खाननं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 65 पेक्षा जास्त सरासरी राखली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 4000 हून अधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये विजय मर्चंट यांची सरासरी सर्वोत्तम आहे. त्यांनी 81.8 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.
सरफराज खानपूर्वी इराणी चषकात वसीम जाफर, युवराज सिंग आणि रवी शास्त्री यांच्यासह 10 फलंदाजांनी द्विशतकं झळकावली आहे. इराणी चषकातील सर्वात मोठी खेळी वसीम जाफरच्या नावावर आहे. त्यानं 2018 मध्ये मुंबईसाठी 286 धावांची इनिंग खेळली होती. मुरली विजय दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 2012 मध्ये ‘रेस्ट ऑफ इंडिया’साठी 266 धावांची खेळी खेळली होती.
हेही वाचा –
बांगलादेशविरुद्ध संधी मिळाली नाही, मुंबईच्या फलंदाजानं इराणी चषकात शतक ठोकून दिलं निवडकर्त्यांना उत्तर!
शतक थोडक्यात हुकलं, पण संघासाठी संकटमोचक बनून आला अजिंक्य रहाणे!
“केएल राहुल लिलावात गेला तर त्याला इतके कोटी मिळतील”, आकाश चोप्राचा लखनऊला इशारा