भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने गुरुवारी (१६ सप्टेंबर) क्रिकेट चाहत्यांना धक्का दिला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर टी२० भारतीय संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी विराटचे कौतुक केले आहे आणि त्याने हा निर्णय का घेतला हे देखील स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात गांगुलीने कोहलीला भारतीय क्रिकेटसाठी “खरी संपत्ती” असे म्हटले आणि भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. गांगुली म्हणाला, “विराट ही भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती आहे आणि त्याने संघाचे चांगले नेतृत्व केले आहे. तो सर्व प्रकारामध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.”
गांगुली पुढे म्हणाला, ‘भविष्यातील रोडमॅप लक्षात घेऊन विराटने हा निर्णय घेतला आहे. विराटने टी -२० संघाचा कर्णधार म्हणून केलेल्या जबरदस्त कामगिरीबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो. आम्ही त्याला आगामी विश्वचषक आणि भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आशा आहे की तो भारतासाठी भरपूर धावा करत राहील.
या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी -२० विश्वचषकानंतरही विराट कोहली भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये केवळ फलंदाज म्हणून खेळेल.
तत्पूर्वी, कोहलीने सांगितले की, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्याशी चर्चा करून आपण आपल्या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘अर्थातच, या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी मला बराच वेळ लागला. माझे जवळचे लोक, रवी भाई आणि रोहित, जे संघाचा एक महत्त्वाचा भाग आहेत, यांच्याशी बरीच चर्चा केल्यानंतर मी टी-20 कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.’
🇮🇳 ❤️ pic.twitter.com/Ds7okjhj9J
— Virat Kohli (@imVkohli) September 16, 2021
विराटने टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत ९० सामने खेळले आहेत आणि २८ अर्धशतकांसह ३१५९ धावा केल्या आहेत. या प्रकारामध्ये त्याचा स्ट्राइक रेट १४० च्या जवळपास आहे. त्याने ४५ टी -२० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, त्यातील २७ सामने भारताने जिंकले आहेत. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ १४ सामने गमावले तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी
कॅप्टन म्हणूनही ‘किंग’! टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी