इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत जगभरातील स्टार खेळाडू सहभाग घेणार आहेत. आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये पार पडणार आहे. तसेच ही स्पर्धा संपल्यानंतर येत्या १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत या खेळाडूंना सराव करण्यासाठी उत्तम संधी मिळाली आहे. चला तर पाहूया, युएईतील दुसऱ्या टप्प्यामुळे कुठल्या संघाला आयपीएल स्पर्धेचा टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी जास्त फायदा होऊ शकतो.
वेस्ट इंडिज संघाला होणार सर्वात जास्त फायदा
टी-२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी आयपीएलमध्ये खेळल्यामुळे जर कुठल्या संघाला जास्त फायदा होत असेल; तर तो वेस्ट इंडिज संघ आहे. या संघातील कायरोन पोलार्ड, ड्वेन ब्रावो, निकोलस पुरण, फेबियन एलेन आणि शिमरोन हेटमायर सारखे खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. त्यामुळे युएईच्या खेळपट्टीवर हे खेळाडू चमकले; तर नक्कीच त्यांना टी-२० विश्वचषक स्पर्धेत याचा जास्त फायदा होईल.
ऑस्ट्रेलिया संघाला देखील होणार फायदा
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ऑस्ट्रेलिया संघातील देखील काही महत्वाचे खेळाडू सहभाग घेणार आहेत. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, जोश हेजलवूड, मार्कस स्टोइनिस, डॅन ख्रिस्टियन हा मोठ्या खेळाडूंचा सहभाग आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलिया संघातील वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. यासह मिचेल स्टार्क, ॲरोन फिंच असे काही खेळाडू यंदा आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाहीये. ज्याचा फटका ऑस्ट्रेलियन संघाला बसू शकतो.
इंग्लंडचे होऊ शकते मोठे नुकसान
इंग्लंड संघातील देखील काही मोठे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत. परंतु याच संघातील काही महत्वाचे खेळाडू जोस बटलर, डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे या खेळाडूंना युएईमध्ये अधिक सराव करण्याची संधी मिळणार आहे. तसेच कर्णधार ओएन मॉर्गन, मोईन अली, सॅम करन, सॅम बिलींग्स, लियाम लिविंटस्टन, आदिल रशिद आणि जेसन रॉय यांसारखे खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळताना दिसून येणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू देखील करणार आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व
दक्षिण आफ्रिका संघातील देखील काही महत्वाचे खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघातील मुख्य गोलंदाज कागिसो रबाडा, एन्रिच नॉर्किए, तबरेज शम्सी आणि लुंगी एन्गिडी यांचा समावेश आहे. या गोलंदाजांना जर आयपीएल स्पर्धेदरम्यान चांगली लाईन आणि लेंथ मिळाली; तर हे गोलंदाज कुठल्याही फलंदाजाला अडचणीत टाकू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
इंजमामचे ‘आलू प्रकरण’ व गांगुलीच्या तुफानी कामगिरीसाठी कायम लक्षात राहिलेली वनडे मालिका
‘नवा बोथम’ म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफविषयी १० रंजक गोष्टी
आयपीएलच्या उत्तरार्धात लागणार विक्रमांची रास, पाच भारतीयांसह पोलार्ड-मॉरिस ठोकणार ‘अनोखे’ शतक?