बांगलादेश क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२२ पासून न्यूझीलंड आणि बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) संघात कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. माउंट मौनगानुई (Mount Maunganui) येथे होत असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंड संघाने सामन्यात वर्चस्व निर्माण केले आहे. दरम्यान, न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने शतकी खेळी केली आहे.
या सामन्यात कॉनवे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याने फलंदाजीला आल्यानंतर चांगला खेळ करत शतक पूर्ण केले. हे त्याचे कारकिर्दीतील दुसरे शतक आहे. विशेष म्हणजे तो मायदेशात पहिलाच कसोटी सामना खेळत आहे. यापूर्वी त्याने खेळलेले तिन्ही कसोटी सामना न्यूझीलंडबाहेर खेळले होते.
त्यामुळे कॉनवे हा पहिला असा खेळाडू ठरला आहे, ज्याने कारकिर्दीत परदेशातील पहिल्या कसोटी सामन्यात आणि मायदेशातील पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी शतकी खेळी केली आहे. कॉनवेने लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध त्याचे कसोटी पदार्पण केले होते. त्यावेळी त्याने द्विशतकी खेळी केली होती. पण, त्याने १०० धावांचा टप्पा सामन्याच्या पहिल्याच दिवशी ओलांडला होता.
सध्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कॉनवेने पहिल्या डावात २२७ चेंडूत १६ चौकार आणि १ षटकारासह १२२ धावा केल्या. त्याने सलामीवीर विल यंगसह १३८ धावांची भागीदारी केली. तसेच अखेरची कसोटी मालिका खेळणाऱ्या रॉस टेलरसह ५० धावांची भागीदारी केली. त्यामुळे या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या दिवसाखेर ८७.३ षटकांत ५ बाद २५८ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून कॉनवे शिवाय विल यंगने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली, तर रॉस टेलरने ३१ धावा केल्या, तसेच हेन्री निकोल्स ३२ धावांवर नाबाद आहे.
अधिक वाचा – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर; रोहित बाहेर, राहुल कर्णधार तर बुमराह उपकर्णधार
यंदाच्या वर्षातील पहिलेच शतक
दरम्यान, २०२२ वर्षातील पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक करण्याचा विक्रम कॉनवेच्या नावावर नोंदवले गेले आहे. विशेष म्हणजे त्याने धावाही १२२ केल्या आहेत. त्यामुळे २१ व्या शतकातील २२ व्या वर्षी त्याने १२२ धावांची खेळी केल्याने २२ आकड्याचा योगायोगही झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विराटला टी२० कर्णधारपद सोडू नको, असं सांगण्यात आले होते’, निवड समीती प्रमुखांकडून स्पष्टीकरण
आयसीसीची टीम इंडियावर मोठी कारवाई, सेंच्यूरियन कसोटीतील ‘ही’ चूक भोवली
विरेंद्र सेहवागच्या बहीणीचा आम आदमी पार्टीत प्रवेश , वाचा पक्षप्रवेशाचे कारण
व्हिडिओ पाहा – टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं