शुक्रवारी (३१ डिसेंबर) भारतीय निवड समीतीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना निवड समीतीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारतीय संघाच्या नेतृत्त्वबदलाबाबतदेखील भाष्य केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटमध्ये नेतृत्त्वबदलाचा मुद्दा गाजत आहे. झाले असे की, टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर विराट कोहली याने भारताच्या टी२० संघाचे नेतृत्त्व सोडले. त्यानंतर अचानक दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी निवड समीतीने विराटकडून वनडे संघाचेही नेतृत्त्व काढून घेत भारताच्या वनडे आणि टी२० संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले. याबद्दल बरीच चर्चा झाली.
दरम्यान, विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी सांगितले होते की, त्याला दीड तास आधी वनडे कर्णधारपदावरून हटवल्याचे निवड समीतीकडून सांगण्यात आले होते. तसेच त्याच्याशी याबद्दल कोणतीही चर्चा केली नव्हती. याबरोबरच विराटने सांगितले होते की, त्याला कोणीही टी२० कर्णधारपद सोडू नको असे सांगितले नव्हते.
मात्र, आता चेतन शर्मा यांनी म्हचले आहे की, टी२० विश्वचषकापूर्वी विराटला कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती. पण, त्याने निर्णयावर ठाम राहत नेतृत्त्वपद सोडले. विशेष म्हणजे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने देखील यापूर्वी म्हटले होते की, त्याने विराटला टी२० कर्णधारपद सोडू नको, असं सांगितले होते.
विराटला टी२० कर्णधारपद न सोडण्यास सांगितले – चेतन शर्मा
दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे संघाची घोषणा करताना नेतृत्त्वबदलाबाबत चेतन शर्मा म्हणाले, ‘विराटने टी२० विश्वचषकापूर्वी टी२० क्रिकेट संघाचे नेतृत्त्व सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे निवड समीतीमधील अधिकाऱ्यांना धक्का बसला. सर्वांनी विराटला या निर्णयावर विचार करण्यास सांगितले होते. निवड समीतीचे मत होते की, एवढा मोठा निर्णय मोठ्या स्पर्धेत संघावर वाईट परिणाम करू शकतो. पण विराट त्याच्या निर्णयावर ठाम राहिला.’
भारताचे माजी क्रिकेटपटू राहिलेले चेतन शर्मा म्हणाले, ‘आम्ही विराटच्या निर्णयाचे सन्मान करतो. पण एवढ्या मोठ्या स्पर्धेपूर्वी कर्णधार जेव्हा सांगतो की, तो स्पर्धेनंतर संघाचा कर्णधार राहाणार नाही, तर प्रत्येकाला आश्चर्यच वाटेल. त्यामुळे त्याला त्याचा निर्णय बदलण्यासाठी अनेकदा सांगण्यात आले. पण विराटच्या काही योजना होत्या आणि तो त्यावर कायम राहिला.’
अधिक वाचा – विषय आहे का? फक्त भारत नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये ‘ही’ किमया साधणारा विराट बनला एकमेव कर्णधार
मर्यादीत षटकांसाठी २ कर्णधार नको
चेतन शर्मा यांनी असंही सांगितले की, मर्यादीत षटकांसाठी दोन कर्णधार असणे, योग्य वाटत नाही. त्यामुळे विराटला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले. विराटला वनडे कर्णधारपदावरून हटवणे हा निवड समीतीचा निर्णय होता. पण टी२० कर्णधारपद सोडणे, हा विराटचा वैयक्तिक निर्णय होता.
याशिवाय चेतन शर्मा यांनी हे देखील स्पष्ट केले की, विराट आणि रोहित यांच्यात कोणतेही मतभेद नाही.
व्हिडिओ पाहा – क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार |
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत केएल राहुल कर्णधार
वनडे संघाचे नियमित कर्णधारपद रोहित शर्माकडे जरी देण्यात आले असले, तरी सध्या रोहित दुखापतग्रस्त असल्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे वनडे मालिकेसाठी केएल राहुलकडे प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या संघात वेंकटेश अय्यर आणि ऋतुराज गायकवाड या युवा क्रिकेटपटूंनाही संधी देण्यात आली आहे. याशिवाय प्रभारी उपकर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत, इशान किशन, युजवेंद्र चहल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीची टीम इंडियावर मोठी कारवाई, सेंच्यूरियन कसोटीतील ‘ही’ चूक भोवली
विरेंद्र सेहवागच्या बहीणीचा आम आदमी पार्टीत प्रवेश , वाचा पक्षप्रवेशाचे कारण
शानदार… जबरदस्त… जिंदाबाद…! टीम इंडियावर आजी-माजी दिग्गजांकडून पडतोय कौतुकाचा पाऊस