नुकताच रविवारी (१४ नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संपली. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने विजेतेपद जिंकले. अशातच दोन दिवसातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढच्या टी२० विश्वचषकाबद्दल मोठी घोषणा केली आहे. टी२० विश्वचषक २०२२ ची स्पर्धा ऑस्ट्रेलियातील ७ मैदानांवर खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा २०२२ मध्ये १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
सात शहरात टी२० विश्वचषकाचे आयोजन
ऑस्ट्रेलियामध्ये २०२२ साली होणारे टी२० विश्वचषकाचे आठवे पर्व असणार आहे. या स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलिया गतविजेते म्हणून उतरतील. या स्पर्धेत एकूण ४५ सामने होणार असून ऍडलेड, ब्रिस्बेन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या ठिकाणी सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे.
या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाईल. त्यापूर्वी ९ आणि १० नोव्हेंबर २०२२ रोजी अनुक्रमे सिडनी क्रिकेट ग्राऊंड आणि ऍडलेड ओव्हलवर उपांत्य सामने पार पडतील.
या संघांना मिळाली सुपर १२ फेरीत जागा
टी२० विश्वचषक २०२२ मधील सुपर १२ फेरीसाठी यजमान ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त आयसीसीच्या टी२० क्रमवारीनुसार न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे ८ संघ थेट पात्र ठरले आहेत.
तर, पहिल्या फेरीसाठी श्रीलंका, वेस्ट इंडिज, नामिबिया आणि स्कॉटलंड खेळतील. अन्य ४ संघ २ पात्रता स्पर्धेतून पहिल्या फेरीसाठी पात्र ठरतील. यातील एक पात्रता स्पर्धा ओमान येथे फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडेल, तर दुसरी पात्रता स्पर्धा झिम्बाब्वेमध्ये जून-जुलै २०२२ दरम्यान पार पडेल.
कोरोनामुळे पुढे ढकलली होती स्पर्धा
यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये २०२० साली टी२० विश्वचषक स्पर्धा होणार होती. पण, कोरोनाच्या प्रभावामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आणि २०२२ साली ऑस्ट्रेलियामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
“मी कायद्याचे पालन करतो”, ५ कोटींची घड्याळं जप्त झाल्याच्या बातमीवर हार्दिक पंड्याने सोडले मौन
टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या बाबर आझमऐवजी डेविड वॉर्नरला मालिकावीर का निवडले? वाचा सविस्तर
मिशेल मार्शने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्यामागे ‘हे’ कारण, स्वत:च केलाय खुलासा