शाकिब अल हसन हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये 4454 धावा आणि 233 बळी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7570 धावा आणि 317 बळी तर टी20 मध्ये 2382 धावा आणि 140 बळी आहेत. असं असूनही शाकिबला चाहत्यांमध्ये हवा तसा आदर मिळत नाही. शाकिबला चटकन राग येतो. तो कधी सहकारी खेळाडूंशी भांडतो तर कधी अंपायर किंवा चाहत्यांशी वाद घालतो.
यावर्षीची बांगलादेशची निवडणूक जिंकल्यानंतर एका चाहत्याला थप्पड मारतानाचा शाकिबचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर विश्वचषक 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अँजेलो मॅथ्यूजला ‘टाइम आऊट’ करण्याचा त्याचा निर्णय खेळाच्या भावनेच्या विरुद्ध मानला गेला. विश्वचषकापूर्वी शाकिब त्याच्याच देशाचा क्रिकेटपटू तमिम इक्बालसोबत झालेल्या वादामुळेही चर्चेत होता.
2014 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात जेव्हा समालोचक शाकिबवर लवकर बाद झाल्यानंतर टीका करत होते, तेव्हा त्यानं पॅव्हेलियनच्या दिशेनं अश्लील हावभाव केले, ज्यामुळे तो वादात सापडला होता. या असभ्य हावभावामुळे शाकिबवर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. तसेच त्याला दंडही ठोठावण्यात आला होता.
2021 मध्ये ढाका प्रीमियर लीगच्या सामन्यात पंचांनी पायचितची अपील नाकारल्यानंतर शाकिबनं लाथ मारून स्टंप उखडून टाकले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शाकिबला काही सामन्यांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. 2010 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शाकिबच्या फलंदाजीदरम्यान साइड स्क्रिनच्या आसपास काहीसा गोंधळ झाला होता. हा प्रकार वारंवार घडल्यानंतर शाकिब स्वत: साईड स्क्रीनजवळ धावत आला आणि तेथे उभ्या असलेल्या व्यक्तीला शिवीगाळ केली.
शाकिबवर स्पॉट-फिक्सिंगसाठी सट्टेबाजांशी संपर्क साधल्याचाही आरोप होता. त्यानं याबद्दल क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसीला माहिती दिली नाही. या कारणामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. नंतर 2021 मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. 2014 मध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डानं शाकिबला पूर्वसूचना न देता प्रशिक्षण शिबिरातून बाहेर पडल्यामुळे निलंबित केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सला मिळाला नवा मलिंगा? ईशानचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
IPL 2024 पूर्वी ऋषभ पंत नेट्समध्ये करतोय हेलिकॉप्टर शॉटचा सराव, पाहा Viral Video