बांगलादेशचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. येथे उभय संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत भारतीय संघानं बांगलादेशला 2-0 ने क्लीन स्वीप केलं. या मालिकेसह बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू शकिब अल हसनची कसोटी कारकीर्दही संपुष्टात आली. त्यानं दुसऱ्या कसोटीपूर्वी निवृत्ती जाहीर केली होती.
वास्तविक, शाकिबनं टी20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली होती. त्यानं असंही सांगितलं की, त्याला त्याच्या कारकिर्दीची शेवटची कसोटी बांगलादेशमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायची आहे. परंतु अद्याप त्याला सुरक्षेचं आश्वासन मिळालेलं नाही. अशा स्थितीत कानपूर कसोटी ही शाकिबच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी ठरू शकते.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, शाकिब अल हसनवर बांगलादेशात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशा स्थितीत त्याला आपल्या सुरक्षेची चिंता आहे. शाकिबला बांगलादेशात परत येताच अटक होण्याची भीती आहे. त्यामुळे तो आपल्या देशात न परतण्याचा विचार करतोय. शाकिब पुढील काही दिवस भारतात राहू शकतो आणि नंतर कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक होऊ शकतो.
बांगलादेशात अलीकडेच सत्तापालट झाला. त्यादरम्यान विरोधामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आणि त्या भारतात आल्या. शाकिब शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग पक्षाचा सदस्य आहे. बांगलादेशात या पक्षाविरोधात प्रचंड रोष आहे. शाकिबनं कानपूर कसोटीपूर्वी पत्रकारांशी बोलताना घरच्या मैदानावर खेळण्यास कोणतीही अडचण नसल्याचं सांगितलं होते. पण परिस्थितीनुसार सुरक्षा आवश्यक असेल, तर त्याच्या मायदेशी परतण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे तो कुटुंबासह अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे.
37 वर्षीय शाकिब अल हसननं बांगलादेशसाठी आतापर्यंत 71 कसोटी खेळल्या, ज्यामध्ये त्यानं 37.78 च्या सरासरीनं 4609 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्यानं 246 विकेट घेतल्या. तो बांगलादेशच्या सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. शाकिबनं 247 एकदिवसीय आणि 129 टी-20 सामने खेळले. त्याच्या नावावर वनडेमध्ये 7570 धावा आणि 317 विकेट आहेत. याशिवाय शाकिबनं आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 2551 धावा केल्या असून 149 विकेट्सही घेतल्या आहेत.
हेही वाचा –
टीम इंडियाला धक्का! पुनरागमन करण्यापूर्वी स्टार खेळाडू पुन्हा जखमी
‘थाला’ची क्रेझ! धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्याचा 1200 कि.मी सायकल प्रवास
IND VS NZ; कसोटी मालिकेपूर्वी टीम साऊदीचा कर्णधारपदाचा राजीनामा