इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय अनेक युवा खेळाडूंनाही मोठ्या रकमेची बोली फ्रँचायझींनी लावली. मात्र, दुसऱ्या बाजूला अनेक दिग्गज खेळाडूंमध्ये कोणत्याच फ्रँचायझींनी रस दाखवला नाही. यात बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन याचाही समावेश आहे. पण आता याबद्दल त्याची पत्नी उम्मी अहमद शिशिर हिने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
शाकिब हा सध्याच्या क्रिकेट विश्वातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातो. त्यातही त्याची टी२०मधील कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये बागंलादेशचा सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या फलंदाज आहे. इतकंच नाही तर तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जगातील एकूण गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. असं असतानाही तो आयपीएल लिलावात अनसोल्ड कसा राहिला, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आता त्यामागचे कारण त्याच्या पत्नीनेच उघड केले आहे.
त्याच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार शाकिब राष्ट्रीय संघाच्या प्रती असलेल्या कर्तव्यामुळे आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला. तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने त्याच्या अनसोल्ड राहाण्यामागील कारण सागितले आहे.
तिने फेसबुकवर लिहिले आहे की, ‘तुम्ही खूप उत्साहित होण्यापूर्वी सांगणे गरजेचे आहे. आयपीएल लिलावापूर्वी अनेक संघांनी त्याच्याशी थेट संपर्क साधला होता की, तो पूर्ण हंगामात उपलब्ध राहू शकतो का, पण श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमुळे त्याला हे शक्य नव्हते. त्याचमुळे त्याला कोणी निवडले नाही आणि ही मोठी गोष्ट नाही. हा काही शेवट नाही. पुढचे वर्ष नेहमीच येत असते.’
तिने पुढे लिहिले, ‘त्यामुळे जर तो निवडला असता, तर त्याला श्रीलंका दौऱ्याला मुकावे लागले असते. त्यामुळे जर तो निवडला गेला असता, तरी तुम्ही असंच म्हणला असता का? की, तुम्ही त्याला आत्तापर्यंत देशद्रोही ठरवले असते? तुमच्या उत्साहावर पाणी फिरवल्याबद्दल माफ करा.’
https://www.facebook.com/sakib.ummeyalhasan/posts/2083586911810491
आयपीएल २०२२ हंगामाला मार्चच्या अखेरीस सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी बांगलादेशला काही आंतरराष्ट्रीय मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे कदाचीत शाकिब पूर्ण हंगामासाठी उपलब्ध राहू शकला नसता.
शाकिबची आयपीएलमधील कामगिरी
शाकिबने आयपीएलमध्ये देखील आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स अशा २ संघांचे आयपीएलमध्ये प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ७१ सामने खेळले असून ७९३ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ६३ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याची आयपीएल २०२२ लिलावासाठी २ कोटी मुळ किंमत होती.
महत्त्वाच्या बातम्या –
नव्या एनसीएची बीसीसीआयने रोवली मुहूर्तमेढ! क्रिकेटपटूंसह इतरही खेळाडूंना मिळणार लाभ
कोटीच्या कोटी उड्डाणे! आयपीएल लिलावात तब्बल ११ खेळाडूंना लागली १० कोटींहून जास्तीची बोली, पाहा यादी