इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल गेल्या काही वर्षांत क्रिकेटमधील एक सगळ्यात लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्पर्धा ठरते आहे. जगभरातील क्रिकेट खेळाडू या स्पर्धेत भाग घेऊन आपले कौशल्य दाखवू इच्छित असतात. मात्र अनेकदा राष्ट्रीय संघ आणि आयपीएल यातील एक निवड करण्याची वेळ खेळाडूंवर येते. अशीच वेळ आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाबाबत येण्याची शक्यता आहे. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी महान खेळाडू शेन वॉर्नने आता भाष्य केले आहे.
आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात
आयपीएल २०२१ च्या हंगामाचे एप्रिल-मे महिन्यात आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा हंगाम मध्यातच स्थगित करावा लागला होता. आता या हंगामाचे उर्वरित सामने येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. मात्र याचवेळी इतर देशांच्या विविध मालिकांचे देखील आयोजन होणार आहे. यात इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सारख्या देशांचाही समावेश आहे. त्यामुळे खेळाडूंना राष्ट्रीय संघ आणि आयपीएल यात एक निवड करावी लागणार आहे.
“पैशांसाठी राष्ट्रीय संघाकडे दुर्लक्ष करणे अयोग्य”
अशातच काही खेळाडू राष्ट्रीय संघाऐवजी आयपीएलला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी महान गोलंदाज शेन वॉर्नने यावर नाराजी व्यक्त केली आहे. जर खेळाडू पैशांसाठी राष्ट्रीय संघ सोडून आयपीएलला प्राधान्य देत असतील तर त्यांना राष्ट्रीय संघात जागा देऊ नये, असे परखड मत त्याने व्यक्त केले. एका पॉडकास्ट मध्ये बोलतांना त्याने हे विधान केले.
वॉर्न म्हणाला, “खेळाडूंना आयपीएल किंवा इतर लीगमधून जो पैसा मिळतो, त्याबाबत माझा आक्षेप नाही. जर त्यांना पैसे कमावण्याची इच्छा आहे तर त्यांनी ते खुशाल करावे. पण जर तुम्ही देशासाठी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक असाल आणि तरी तुम्ही त्याआधी आयपीएलची निवड करणार असाल, तर अशा खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान देणे योग्य नाही. कारण असे झाले तर खेळाडू कारणे काढून आराम करतील आणि कसोटी क्रिकेट खेळणार नाही. पैशासाठी ते देशाकडून खेळण्याची संधी सोडणार असतील तर ही चुकीची गोष्ट आहे.”
शेन वॉर्न आयपीएल मधील राजस्थान रॉयल्सचा मेंटॉर देखील आहे. “जर तुम्ही पैशांची निवड करणार असाल तर काही हरकत नाही. पण मग त्यासाठी तुम्हाला कसोटी सामने बाहेर बसावे लागू शकते. तुम्ही कितीही मोठे खेळाडू असाल तरीही. कारण तुमची जागा घेण्यासाठी प्रत्येक वेळी कोणीतरी खेळाडू तयार असतो”, असे यावेळी वॉर्नने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
अतरंगी बहिण-भाऊ! श्रेयस अय्यर लहान बहिणीबरोबर खेळतोय ‘हा’ अनोखा खेळ, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ तिघांचा समावेश झाला तर ‘मिशन इंग्लंड’ होणार फत्ते