भारतीय संघाला क्रिकेटच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणारा माजी कर्णधार एमएस धोनी त्याच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. असे म्हणले जाते की, परिस्थिती कशीही असूद्या धोनी कधीच चिडत नाही. परंतु चेन्नई सुपर किंग्जचा माजी सलामीवीर फलंदाज आणि धोनीचा जुना सहकारी शेन वॉटसनच्या त्या एका सामन्याचा खुलासा केला आहे, जेव्हा धोनीचा देखील संयम सुटला होता.
शेन वॉटसनने सांगितल्यानुसार, एमएस धोनी (MS Dhoni) सर्वात शांत स्वभावाचा खेळाडू आहे. धोनी पूर्ण प्रयत्न करतो की, जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, ती ड्रेसिंग रूमच्या बाहेर राहावी. जेणेकरून खेळाडू चिंतेत पडू नयेत आणि त्यांना दबाव देखील जाणवू नये. असे असले, तरी वॉटसनने सांगितल्यानुसार एका सामन्यात धोनीला देखील राग आला होता. धोनीला चिडलेला पाहण्याची ही शेन वॉटसनसाठी (Shane Watson) पहिली आणि शेवटची वेळ होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
शेन वॉटसनने केवळ एकदा पाहिला आहे चिडलेला धोनी
माध्यमांतील वृत्तानुसार, शेन वॉटसन म्हणाला की, “जेव्हा तुम्हा विचारता की, धोनीला राग येतो की नाही? तर मी त्याला फक्त एकदा चिडलेला बघितले होते. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०१९च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाला होता, तेव्हा धोनीला मी रागात पाहिले होते. अर्ध्या वाटेत असताता त्याने स्वतःच्या बॅगवर हळूच मारले होते. त्यावरून समजू शकते की, त्याला त्या पराभवाचे किती दुःख झाले होते. परिस्थिती कशीही असूद्या धोनी नेहमी शांत राहतो. सर्वात महत्वाची गोष्ट असते तुम्ही तुमचा सर्व ताण क्रिकेटच्या त्या वातावरणापासून लांब ठेवला पाहिजे. धोनीला हे काम चांगले जमते.”
दरम्यान, आयपीएल २०२२ ची सुरुवात होण्यापूर्वी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले आणि ही जबाबदारी रवींद्र जडेजाला सोपवली गेली. आता धोनी एका यष्टीरक्षक फलंदाजाच्या रूपात सीएसकेचे प्रतिनिधित्व करत आहे. चालू हंगामात त्याचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यात त्याने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला आणि सीएसकेला विजय मिळवून दिला.