---Advertisement---

भारतीय संघाचे ‘मिशन श्रीलंका!’ धवनसह संघाच्या निशाण्यावर असतील ‘हे’ विक्रम

On: मंगळवार, जून 29, 2021 8:26 PM
Shikhar Dhawan india
---Advertisement---

येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात ते तीन टी20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या दरम्यान भारताच्या पहिल्या फळीतील संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने दुसऱ्या फळीतील खेळाडूंची निवड श्रीलंका दौऱ्यासाठी करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व डावखुरा सलामीवीर शिखर धवनकडे देण्यात आले आहे.

या दौऱ्यात शिखर धवन भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पदार्पण करेल. तर याशिवाय इतरही काही विक्रम त्याच्या निशाण्यावर असतील. या लेखात त्याचबद्दल आपण जाणून घेऊया.

सर्वप्रथम धवनकडे श्रीलंकेत टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरण्याची संधी असेल. एक भारतीय खेळाडू म्हणून श्रीलंकेत टी20 मध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराट कोहलीने 7 सामन्यांमध्ये सर्वाधिक 335 धावा केल्या आहेत. यात त्याने 4 अर्धशतक ठोकले आहे. सुरेश रैना (282) दुसऱ्या तर रोहित शर्मा (268) तिसऱ्या स्थानावर आहे. शिखर धवन 198 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. जरयेत्या श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेमध्ये त्याने 71 धावा केल्या तर तो रोहित शर्माला मागे टाकून तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.

कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने श्रीलंकेत टी20 मध्ये 6 सामने जिंकले आहेत. रोहित शर्मा 4 विजयासह दुसऱ्या तर विराट कोहली 1 विजयाने तिसऱ्या स्थानावर आहे. कर्णधार म्हणून शिखर धवनने जर 2 सामने जिंकले तर तो विराट कोहलीला मागे टाकेल.

भारताचा श्रीलंकेविरुद्ध चांगला रेकॉर्ड-
श्रीलंकेविरुद्ध सर्व संघाचे टी 20 चे विक्रम पाहिले तर भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध आत्तापर्यंत 19 टी20 सामने खेळले आहेत तर त्यापैकी 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. म्हणजेच भारतीय संघाने जवळजवळ 70 टक्के सामने जिंकले आहेत. तर 5 सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे.

त्याचवेळी श्रीलंकेचा मागील काही मालिकेतील रेकॉर्ड अतिशय खराब आहे. श्रीलंका संघाला शेवटच्या 5 टी20 मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. यादरम्यान त्यांना चार मालिकांमध्ये तर एकही विजय मिळवता आला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकन संघाने तीन सामन्यांची मालिका खेळली ज्यात त्यांना 0-3 ने पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर भारताविरुद्ध 0-2, वेस्ट इंडिजविरुद्ध आणि इंग्लंड विरुद्ध 0-3 पराभव पत्करावा लागला.

या रेकॉर्डमुळे भारतीय संघाला ‘मिशन श्रीलंका’ फत्ते करायला फारसे कठीण जाणार नाही, असा अंदाज वर्तवला जातो आहे. त्यामुळे युवा खेळाडूंचा भारतीय संघ धवनच्या नेतृत्वाखाली कशी कामगिरी करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी क्रिकेटचे सम्राट न्यूझीलंडला टक्कर देण्यासाठी माजी क्रिकेटपटूने निवडला संघ, कोहली-रहाणेला वगळले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---