पुणे। बुधवारी (१३ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील २३ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. हा सामना पंजाब किंग्सने १२ धावांनी जिंकत हंगामातील तिसरा विजय नोंदवला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यातील पंजाबच्या विजयात सलामीवीर शिखर धवनने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्यांनी एका खास विक्रमालाही गवसणी घातली.
शिखरचा आयपीएलमध्ये मोठा विक्रम
शिखरने (Shikhar Dhawan) पंजाब किंग्सकडून खेळताना ५० चेंडूत ७० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये ८०३ वेळा चेंडू सीमापार करण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ६७३ चौकार आणि १३० षटकार मारले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा चेंडू सीमापार करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर पाठोपाठ विराट कोहली (Virat Kohli) आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल (Chris Gayle) आहे. विराटने ५५४ चौकार आणि २१२ षटकार असे मिळून ७६६ वेळा चेंडू सीमापार केला आहे. तसेच ख्रिस गेलने ४०५ चौकार आणि ३५७ षटकार असे मिळून ७६१ वेळा चेंडू सीमापार केला आहे (Most Boundaries Hit in IPL).
शिखर आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणाराही खेळाडू आहे. त्याने १९८ आयपीएल सामने आत्तापर्यंत खेळले असून ५९८१ धावा केल्या असून यात ६७३ चौकारांचा समावेश आहे.
पंजाबने मिळवला तिसरा विजय
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबकडून मयंक अगरवाल आणि शिखर धवन या सलामीवीरांच्या जोडीने ९७ धावांची भागीदारी केली. मयंक ३२ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला, तसेच शिखरने ५० चेंडूत ७० धावांची खेळी केली. त्याचबरोबर जितेश शर्माने १५ चेंडूत ३० धावांची खेळी केली. त्यामुळे पंजाबला २० षटकांत ५ बाद १९८ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सकडून बासिल थम्पीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या (MI vs PBKS).
त्यानंतर १९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सकडून युवा डेवाल्ड ब्रेविसने २५ चेंडूत ४९ धावांची आणि सूर्यकुमारने ३० चेंडूत ४३ धावांची खेळी केली. तसेच तिलक वर्माने २० चेंडूत ३६ धावा केल्या. मात्र, अन्य कोणाला मोठे योगदान देता आले नाही. त्यामुळे मुंबईला २० षटकांत ९ बाद १८६ धावाच करता आल्या. पंजाबकडून ओडियन स्मिथने ४ विकेट्स घेतल्या. पंजाबचा हा हंगामातील तिसरा विजय आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितवर बंदीची टांगती तलवार! मुंबई इंडियन्सची ‘ही’ एक चूक पडू शकते भलतीच महागात
‘आता तर सवयच झाली’, मुंबई इंडियन्सच्या सलग ५ व्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल राजस्थान वि. गुजरात सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही