भारतात सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने कहर केला आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. याच प्रयत्नांना मदत म्हणून विविध क्रिकेटपटू आर्थिक मदत देखील करत आहे.
यात परदेशी खेळाडूंसह भारतीय क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे. यातच आता भारताचा सलामीवीर आणि सध्या सुरू असलेल्या आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणार्या शिखर धवनची देखील भर पडली आहे. त्याने देखील भारतातील कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
‘इतक्या’ रकमेची करणार मदत
शिखर धवनने २० लाख रुपये कोरोना लढ्यात मदत म्हणून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच आयपीएल मधील प्रत्येक सामन्यानंतर वैयक्तिक जो पुरस्कार मिळेल, त्याचा संपूर्ण निधी देखील यात देण्याचे त्याने ठरवले आहे. हा संपूर्ण निधी मिशन ऑक्सिजन या मोहिमेला दिला जाईल. या मोहिमे अंतर्गत देशातील ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे धवनची ही मदत कोरोना विरोधातील लढाईत सरकारला आणि जनतेला बळ देणारी ठरली आहे.
शिखर धवनने आज ट्विट करत ही माहिती दिली. या ट्विटमध्ये तो म्हणाला, “आपण सगळेच अतिशय कठीण काळातून जात असून या प्रसंगी आपण शक्य तितकी मदत एकमेकांना करायला हवी आहे. अनेक वर्षांपासून मला देशवासियांनी पाठींबा दिला आहे. आणि आता मी त्याची परतफेड करण्याची वेळ आहे. याचाच भाग म्हणून मी २० लाख रुपये मदत जाहीर करतो आहे. तसेच तसेच आयपीएलच्या सामन्यात मला जे काही सामन्यानंतर पुरस्कार मिळतील त्याचाही निधी मी मिशन ऑक्सिजन या मोहिमेला मदत म्हणून देणार आहे.”
— Shikhar Dhawan (@SDhawan25) April 30, 2021
धवनने मानले कोरोना योद्ध्यांचे आभार
शिखर धवनने ट्विट करत कोरोना योद्ध्यांचे आभार देखील मानले आहेत. तो म्हणाला, “कोरोना काळात आघाडीवर राहून काम करणार्या सगळया कोरोना योद्ध्यांचे त्यांच्या अनन्यसाधारण कामासाठी आभार मानतो. आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत.”
तसेच “मी सगळ्यांना विनंती करतो की या काळात सरकारने लावलेल्या निर्बंधांचे पालन करा. मास्क घाला, हात वारंवार सॅनिटाईज करा आणि सुरक्षित अंतर पाळा. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा”, असे आवाहन देखील धवनने केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थानच्या आणखी एका खेळाडूने केले मोठे मन, कोविड रुग्णासाठी केली इतकी मदत
खेळाडू म्हणून ६ पैकी ६ आयपीएल फायनल जिंकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू