भारताचा दिग्गज सलामीवीर शिखर धवननं 24 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 38 वर्षीय धवनच्या निवृत्तीची बातमी ऐकून भारतीय चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र आता धवननं चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. निवृत्ती घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी शिखर धवननं क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची घोषणा केली.
‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, शिखर धवन लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळणार आहे. धवननं म्हटलं की, “या लीगमध्ये सामील होणं हा निवृत्तीनंतर माझ्यासाठी सर्वात योग्य निर्णय वाटतो. क्रिकेट खेळण्यासाठी माझं शरीर अजूनही तंदुरुस्त आहे. मी निवृत्ती घेण्याच्या निर्णयानं खूश आहे. मात्र क्रिकेट हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, जो माझ्यापासून कधीही हिरावून घेतला जाऊ शकत नाही.”
लिजेंड्स लीग क्रिकेटचा पुढील हंगाम सप्टेंबर महिन्यात सुरू होईल. या स्पर्धेत निवृत्त क्रिकेटपटू खेळताना दिसतात. मागील हंगामात या लीगमध्ये युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि हरभजन सिंगसारखे अनेक भारतीय दिग्गज खेळाडू खेळताना दिसले होते. यासह या लीगमध्ये निवृत्त विदेशी क्रिकेटपटूही खेळतात.
लिजेंड्स लीग क्रिकेटचे सह-संस्थापक रमन रहेजा यांनी शिखर धवनच्या सामील होण्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. धवनच्या आगमनानं लीगमधील स्पर्धेची पातळी वाढेल आणि आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहण्यासाठी चाहते अधिक उत्साही असतील, असं ते म्हणाले.
शिखर धवनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6,793 धावा केल्या. त्याच्या नावावर 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये 17 शतकं आणि 39 अर्धशतकं आहेत. याशिवाय धवननं 34 कसोटी सामन्यांमध्ये 2,315 धावा आणि 68 टी20 सामन्यात 1,759 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
टी20 विश्वचषकादरम्यान आर्थिक नुकसान झालं, ‘स्टार स्पोर्ट्स’नं आयसीसीकडे मागितली कोट्यवधी रुपयांची सवलत!
राहुल द्रविडच्या मुलाचा फ्लॉप शो जारी, बंगळुरूविरुद्ध संघाचा एकतर्फी पराभव
ठरलं! आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्ज या 5 खेळाडूंना रिटेन करणार, शिखर धवनचं भविष्य काय?






