आयपीएल २०२१ चा हंगामातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यादरम्यान खेळला गेला. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला सात गड्यांनी पराभूत करत हंगामाची विजयी सुरुवात केली. ८५ धावांची खेळी करणारा सलामीवीर शिखर धवन या सामन्याचा नायक ठरला. त्याने आपल्या खेळीदरम्यान एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
धवनचे धमाकेदार अर्धशतक
चेन्नईकडून मिळालेले १८९ धावांचे आव्हान पार करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून अनुभवी शिखर धवन व युवा पृथ्वी शॉ ही जोडी मैदानात उतरली. त्यांनी अगदी पहिल्या षटकापासून आक्रमक फलंदाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दोघांनीही अवघ्या १३.३ षटकात १३८ धावांची मॅच विनिंग भागीदारी केली.
शॉ ७२ धावा काढून परतल्यानंतरही धवनने आपली खेळी ८५ धावांपर्यंत नेली. धवनने आपल्या खेळीत १० चौकार व दोन षटकार लगावले. तो शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. मागील वर्षी देखील त्याने चेन्नई सुपर किंग्स्स्स् विरुद्ध शतक झळकावले होते.
चेन्नईविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
या खेळी दरम्यान धवनने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक धावा बनविणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. धवनने सीएसकेविरूद्ध आता ९१० धावा ठोकल्या आहेत. यापूर्वी सीएसकेविरुद्ध सर्वाधिक धावा बनविण्याचा मान विराट कोहलीकडे होता. त्याने चेन्नईविरुद्ध ९०१ धावा बनविल्या आहेत.
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा असून त्याने चेन्नईविरुद्ध ७४९ धावा ठोकल्या आहेत. सीएसकेविरुद्ध सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या व पाचव्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर व एबी डिव्हिलियर्स आहेत. त्यांनी अनुक्रमे ६१७ व ५९३ धावा फटकावल्या आहेत. या यादीमध्ये ५९० धावांसह सहाव्या स्थानी असलेला रॉबिन उथप्पा यावर्षी चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे
लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ
IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय