आयपीएलचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीएल २०२२ ची (IPL 2022) तयारी सर्व फ्रॅंचायझींनी सुरू केली आहे. वेस्ट इंडीजचा खेळाडू शिमराॅन हेटमायरला (Shimron Hetmyer) यावर्षीच्या लिलावात राजस्थान राॅयल्स (Rajasthan Royals) संघाने खरेदी केले आहे आणि तो मुंबईला आपल्या संघासोबत सरावासाठी पोहोचला आहे. तो यावर्षीच्या आयपीएलमध्ये वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये तो फ्रॅंचायझीच्या प्रमुख जर्सीचा रंग गुलाबी असल्याने त्याने त्याच्या केसांचा रंग सुद्धा गुलाबी केला आहे.
रविवारी (१३ मार्च) राजस्थान राॅसल्स संघाच्या अधिकृत ट्वीटर आकाऊंटवर फ्रॅंचायझीने हेटमायरचा या लूकमधील फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्यांनी लिहिले आहे की ‘प्रेम केसांमध्ये आहे. वेलकम होम’. हा फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. हेटमायर आपल्या वेगवान गोलंदाजीशिवाय त्याच्या सतत बदलत राहणाऱ्या लूकमुळे सुद्धा चर्चेत असतो. यापुर्वी त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग असताना केसांचा रंग दिल्लीच्या जर्सीनुसार नीळा केला होता.
Love is in the hair! 😄💗
Welcome home, @SHetmyer 🏠#RoyalsFamily pic.twitter.com/qB6TVgAZ53
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 13, 2022
या डाव्या हाताच्या फलंदाजाला राजस्थान राॅयल्स संघाने ८ कोटी ५० लाख रुपयांना विकत घेतले आहे. त्याच्यावर मधल्या फळीत फलंदाजीची जबाबदारी असणार आहे. मागील काही काळात वेस्ट इंडीज संघातून बाहेर असलेला हा खेळाडू या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
राजस्थान रॉयल्स संघाचे वेळापत्रक
राजस्थान राॅयल्स संघाचा पहिला सामना २९ मार्च रोजी एमसीए स्टेडियममध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघासोबत पार पडणार आहे. तसेच दुसरा सामना २ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघासोबत डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. ५ एप्रिल रोजी राजस्थान संघ रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघासोबत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना खेळणार आहे. १० एप्रिल रोजी लखनऊ विरुद्ध राजस्थान वानखेडे येथेच सामना खेळणार आहे.