भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला सुरू गवसला नव्हता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्ध भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेत चांगले पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संघाच्या या विजयाने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तर चांगलाच प्रभावित झाला आहे. स्कॉटलंडविरुद्ध भारतीय संघाच्या शानदार विजयावर शोएब अख्तरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघ कदाचित अशी कामगिरी करेल, ज्याची लोकांनी कल्पनाही केली नसेल, असे त्याने म्हटले आहे.
भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी स्कॉटलंडला मोठ्या फरकाने पराभूत करणे आवश्यक होते आणि भारतीय संघाने ते साध्य केले. आता जर अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्ध जिंकला, तर भारतीय संघ उपांत्यफेरीत पोहोचू शकतो. याआधी भारताला सलग दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्कॉटलंडविरुद्धच्या शानदार विजयानंतर शोएब अख्तरने ट्वीट करून मोठी प्रतिक्रिया दिली.
तो म्हणाला, “विश्वचषक स्पर्धा आता खूपच मनोरंजक झाली आहे. अशक्य वाटणाऱ्या चमत्काराच्या दिशेने भारताची वाटचाल होताना दिसत आहे. अफगाणिस्तानचा संघ आता न्यूझीलंडविरुद्ध खूप दडपणाखाली असेल. त्यांच्यासाठी हा सामना अत्यंत कठीण राहणार आहे.”
World Cup becomes very interesting. It seems like India is heading closer to the miracle which looked impossible.
New Zealand will be under a lot of pressure against Afghanistan. It will be a virtual quarter final for them.Full video: https://t.co/OTfprrwjZi pic.twitter.com/syzyk5BSVD
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 5, 2021
तत्पूर्वी, भारतीय संघाने स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडचा संघ अवघ्या ८५ धावांवर सर्वबाद झाला होता. यादरम्यान भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने संघासाठी जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने चार षटकांमध्ये अवघ्या १५ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांची कामगिरीही चांगली राहिली होती. भारतीय संघासाठी नेट रनरेट चांगला ठेवण्यासाठी हे लक्ष्य ४३ चेंडूत गाठायचे होते आणि भारतीय संघाने ३९ चेंडूत हे लक्ष्य गाठले.
केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी स्फोटक खेळी खेळली. केएल राहुलने १९ चेंडूत ५०, तर रोहित शर्माने १६ चेंडूत ३० धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”
-‘बुमराह असावा भारताचा पुढील कर्णधार’; ‘हे’ कारण देत दिग्गजाने वाढवली यादी