---Advertisement---

पाकिस्तानची वाढली धाकधूक; दोन मॅचविनर उपांत्य सामन्याआधी फणफणले तापाने

On: गुरूवार, नोव्हेंबर 11, 2021 11:13 AM
---Advertisement---

सध्या युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळला जाईल. दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना गुरुवारी (११ नोव्हेंबर) सुरू होईल. साखळी फेरीत अपराजित राहिलेल्या पाकिस्तान संघासाठी मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली. संघाचे दोन अनुभवी खेळाडू आजारी झाले असून, त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

हे दोन खेळाडू पडले आजारी
टी२० विश्वचषक इतिहासातील आपली तिसरी अंतिम फेरी खेळण्याच्या उद्देशाने पाकिस्तान संघ गुरुवारी मैदानात उतरेल. साखळी फेरीत त्यांना एकही पराभव पत्करावा लागला नव्हता. बुधवारी संघाचे सराव सत्र आयोजित करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वी संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवान व अनुभवी शोएब मलिक यांना हलका ताप आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू सराव सत्रात भाग घेऊ शकले नाहीत. तसेच या दोघांची आणि संपूर्ण संघाची कोविड चाचणी देखील केली गेली. यामध्ये सर्व खेळाडूंचे अहवाल नकारात्मक आले.

दोघांनी केली आहे शानदार कामगिरी
बाबर आझम याच्यासोबत मोहम्मद रिझवान याने संघाला नेहमी दमदार सलामी दिली आहे. त्याने स्पर्धेत दोन अर्धशतकांसह २०० हून अधिक धावा काढल्या आहेत. तो या संपूर्ण वर्षात सर्वाधिक टी२० धावा काढणारा फलंदाज आहे. दुसरीकडे, शोएब मलिकने न्यूझीलंड आणि स्कॉटलंडविरूद्धच्या सामन्यात संघासाठी निर्णायक भूमिका बजावली होती. त्याच्या नावे स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक देखील आहे.

हे आहेत पर्याय
हे दोन्ही खेळाडू उपांत्य सामन्यात न खेळल्यास यष्टीरक्षक रिझवानच्या जागी माजी कर्णधार सर्फराज खान याची वर्णी लागू शकते. अशा परिस्थितीत फखर झमान सलामीवीर म्हणून भूमिका बजावू शकतो. तर मधल्या फळीत युवा फलंदाज हैदर अली मलिकची जागा घेऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---