IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने घेतलेला अप्रतिम कॅच सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. “सीझनचा बेस्ट कॅच” अशी ओळख मिळालेल्या या क्षणाने सामन्याचा संपूर्ण कलच बदलून टाकला.
18व्या षटकात हार्दिक पांड्याने मोठा फटका खेळला. लॉन्ग ऑनवर उभ्या असलेल्या अय्यरने हवेत झेप घेत चेंडू पकडला आणि सीमारेषेबाहेर जाण्यापूर्वी तो मैदानात फेकला. त्यानंतर जेवियर बार्टलेट याने कॅच पूर्ण केला. अधिकृत नोंद बार्टलेटच्या नावावर झाली असली तरी या कॅचमागील मुख्य भूमिका अय्यरचीच होती.
या कॅचवेळी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा आश्चर्यचकित करणारा रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाला. दोन्ही खेळाडू अय्यरच्या या प्रयत्नाने थक्क झालेले दिसले.
सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, क्विंटन डी कॉक याने 60 चेंडूत 112 धावांची नाबाद खेळी करत मुंबईला मजबूत धावसंख्या उभारून दिली. त्याला नमन धीर याची साथ लाभली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली आणि मुंबईने 195 धावांपर्यंत मजल मारली.
196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्जने आक्रमक सुरुवात केली. प्रभसिमरन सिंग याने 39 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या, तर कर्णधार अय्यरने 35 चेंडूत 66 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 139 धावांची भागीदारी रचत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. पंजाब किंग्जने 16.3 षटकांत 198 धावा करत 7 विकेट्सनी सहज विजय मिळवला. या विजयासह किंग्ज संघ स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ ठरला असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
गोलंदाजीत अर्शदीप सिंग याने 22 धावांत 3 विकेट्स घेत महत्त्वाची कामगिरी बजावली. अय्यरचा कॅच आणि त्याचे नेतृत्व हेच या विजयाचे मुख्य आकर्षण ठरले.






