रणजी ट्रॉफी 2024-25 चा हंगाम सुरू झाला आहे. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यात अ गटातील सामना शरद पवार क्रिकेट अकादमीत खेळला जातोय. महाराष्ट्राचा पहिला डाव 126 धावांत आटोपल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी संघाला जोरदार सुरुवात करून दिली. युवा फलंदाज आयुष म्हात्रेच्या शतकानंतर आता स्टार फलंदाज श्रेयस अय्यरनं देखील या सामन्यात आपल्या बॅटनं आपली जादू केली आहे.
मुंबईचे सलामीवीर पृथ्वी शॉ (1) आणि अजिंक्य रहाणे (31) धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर श्रेयस अय्यरनं आयुष म्हात्रेच्या साथीनं डावाची धुरा सांभाळली. त्यानं प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 14वं शतक झळकावलं. त्यानं 131 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. रणजी ट्रॉफी 2024-24 हंगामातील हे त्याचं पहिलं शतक होतं. त्याच्या खेळीमुळे मुंबईनं महाराष्ट्राविरुद्ध 150 हून अधिक धावांची आघाडी घेत सामन्यात आपली पकड मजबूत केली आहे.
श्रेयस अय्यर या वर्षी जानेवारीत इंग्लंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या कसोटी दौऱ्यापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. गेल्या काही देशांतर्गत सामन्यांमध्ये देखील त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी पाहायला मिळाली नव्हती. अय्यर दुलीप ट्रॉफी 2024 आणि इराणी कप 2024 मध्ये खूप फ्लॉप ठरला होता. त्यामुळे त्याच्या टीम इंडियात पुनरागमनाच्या आशांना मोठा धक्का बसला होता. परंतु आता रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकावून त्यानं पुन्हा एकदा भारतीय संघासाठी आपली दावेदारी सादर केली आहे.
अय्यरशिवाय आयुष म्हात्रेनंही महाराष्ट्राविरुद्ध रणजी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. मुंबईकडून याच हंगामात पदार्पण करणारा म्हात्रे 176 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 22 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्यानं श्रेयस अय्यरसोबत चौथ्या विकेटसाठी जवळपास 200 धावांची भागीदारी केली. आयुष म्हात्रेनं अलीकडेच बडोदाविरुद्ध रणजी पदार्पण केलं होतं. मुशीर खानच्या दुखापतीनंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा –
पावसाचा भारताला फायदा! 46 धावांवर ऑलआऊट होऊनही रोहित-सेना इतिहास रचण्याच्या मार्गावर…
हेल्मेट काढलं, मैदानाभर धावला…सरफराजचं सेंच्युरी सेलिब्रेशन एकदा पाहाच; कोहली-रोहितनंही दिलं स्टँडिंग ओव्हेशन!
ind vs nz; सर्फराज खानचे मेडन शतक, टीम इंडिया 300 पार…