भारताने श्रीलंका संघाला (India vs Sri Lanka) तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत क्लीन स्वीप देत ३-० ने मालिका खिशात घातली. या मालिकेत भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर याने (Shreyas Iyer) शानदार कामगिरी केली आहे. त्यानंतर तो त्याच्या फलंदाजीमुळे तुफान चर्चेत आहे. गेल्यावर्षी दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून लांब असलेल्या श्रेयसने शानदार पुनरागमन केले आहे. वेस्ट इंडिज तसेच श्रीलंका टी२० मालिकेत त्याने धावांचा पाऊस पाडला. आता त्याने दुखापतीनंतर इतके चांगले पुनरागमन कसे करू शकला आणि टी२० क्रिकेटबद्दल त्याचे काय विचार आहेत, याबद्दल भाष्य केले आहे.
अय्यर म्हणाला, “दुखापतीनंतर प्रवीण अमरे सरांनी मला खूप मदत केली. त्यांच्यामुळेच पुनरागमन करु शकलो. स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक रजनीकांत यांनीही माझ्या पुनरागमनात मोठे योगदान दिले आहे. ते सर्वोत्तम प्रशिक्षक आहेत. मला कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे? हे रजनीकांत यांना माहीत आहे. तीनही प्रकारामध्ये खेळण्यासाठी खेळाडूला काय आवश्यक आहे हे रजनीकांत यांना माहीत आहे. त्यांनी मला दुखापतीनंतर पुनरागमन करण्यास मदत केली आहे. एनसीएमध्येही मला खूप मदत मिळाली.”
अय्यर टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना टी२० क्रिकेटबद्दल म्हणाला, “सध्याचा टी२० संघ खूप मजबूत आहे. जे खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहेत, ते प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंइतकेच हुशार आहेत. या खेळाडूंमध्ये कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करण्याची ताकद आहे. मला वाटते की आपल्याला विचारांवर अधिक काम करण्याची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर धावा काढण्याचा विचार करावा लागेल. मला वाटते की एक फलंदाज म्हणून तुम्ही डॉट बॉल खेळलात, तर तो गुन्हा आहे. डॉट बॉलमुळे फलंदाजावर दबाव येतो. वेस्ट इंडिजचा संघातील फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच धावा काढण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला एक चांगला स्कोअर करण्याची गरज आहे.
अय्यर म्हणाला, “न्यूझीलंड दौऱ्यात मला माझी भूमिका माहित होती. मी कोणत्या नंबरवर खेळणार हेही मला माहीत होतं. मला वाटते की प्रत्येक खेळाडूने कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करायला हवी. तुम्ही कोणत्याही भूमिकेत जाऊ शकता आणि स्वत:ला सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. ही भारतीय संघाची विचारसरणी आहे.”
रोहित शर्माचे कौतुक करताना अय्यर म्हणाला, “रोहित शर्मा कर्णधार म्हणून हुशार आहे. तो खेळाडूनुसार विचार करतो. तो प्रत्येक खेळाडूला समजून घेतो आणि त्याला प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफकडून काय हवे आहे, हे त्याला माहीत असते. मी रोहित शर्माला देशांतर्गत क्रिकेटपासूनच ओळखतो आणि तो काय विचार करतो हेही मला माहीत आहे. वातावरण एकदम अप्रतिम आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘हिटमॅन’चे ट्विटर अकाऊंट हॅक? रोहितच्या विचित्र ट्वीट्सची मालिका पाहून चाहते गोंधळले
‘टीव्हीवर माझं नाव दिसत होतं आणि…’, केकेआरचा नवा कर्णधार श्रेयसने सांगितल्या मेगा लिलावातील भावना
महिला विश्वचषक ते आयपीएल २०२२, मार्च महिना क्रिकेटप्रेमींसाठी ठरणार आहे पर्वणी