भारतीय संघाचा हरहुन्नरी फलंदाज व आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणारा श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने भारतीय संघाबाहेर आहे. तो या दुखापतीतून सावरला असून, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२१ च्या हंगामात तो खेळू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रेयसने नुकतेच एका मुलाखतीत बोलताना आपल्या कारकीर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम स्लेजिंगविषयी खुलासा केला.
श्रेयसने केला उलगडा
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व भारतीय संघात आपले स्थान भक्कम केलेल्या श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाचे इयान हिगींग्स व सॅम पेरी यांच्यासोबत नुकताच युट्युबवर संवाद साधला. या मुलाखतीत त्याने आपल्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्लेजिंगबाबत खुलासा केला.
श्रेयस म्हणाला, “ऑस्ट्रेलियाचा संघ २०१७ मध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी भारतात आलेला. मालिकेपूर्वी तीनदिवसीय सराव सामन्याचे आयोजन मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर करण्यात आले होते. त्यावेळी भारत अ संघाचा सदस्य होतो. याच सामन्यात मी आतापर्यंतचा सर्वात्तम स्लेजिंग अनुभव घेतला.”
श्रेयस आपला अनुभव सांगताना म्हणाला, “भारताचे दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर मी फलंदाजीसाठी उतरलो. मात्र, पहिला चेंडू खेळण्याआधीच यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने पाठीमागून स्लेजिंग करायला सुरुवात केली. त्याला समोरून डेव्हिड वॉर्नर सामील झाला. मी त्यांचे बोलणे मनावर घेतले नाही व नॅथन लायनच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर, वेड म्हणाला मी बोललो तसेच झाले. हा मोठे फटके मारणार. मी पुढील चेंडूवर चौकार ठोकला तेव्हा वॉर्नरने म्हटले हा येथून आयपीएलमधील कर्णधारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, मी शांत राहणेच पसंत केले.”
या सामन्यात बावीस वर्षीय श्रेयसने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची तुफान धुलाई करताना २१० चेंडूंचा सामना करत २७ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने २०२ धावा फटकावल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड-भारत कसोटी मालिकेत पुन्हा घुमणार प्रेक्षाकांचा आवाज, पंतप्रधानांची मोठी घोषणा
टोकियो ऑलिंपिकच्या उद्घाटन सोहळ्यात मेरी कोमसह ‘हा’ खेळाडू असेल भारतीय पथकाचा ध्वजधारक
नादच खुळा! कोहलीने दिलेले ‘बॅट बॅलेन्स चॅलेंज’ रैनाने केले मान्य; मग काय झालं पाहाच