न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. ग्रीन पार्क, कानपूर येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने ५७ षटकात १२९ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड संघाने अद्याप एकही विकेट गमावलेली नाही. विल यंग आणि टॉम लॅथम खेळपट्टीवर तग धरून उभे आहेत. तरीही न्यूझीलंड संघ सध्या भारतीय संघापेक्षा २१६ धावांनी मागे आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शतकवीर श्रेयस अय्यरने सुनील गावसकर यांनी कसोटी कॅप देतांना काय सांगितले यावर भाष्य केले आहे.
जेव्हा सुनील गावसकर यांनी तुला कसोटी कॅप दिली तेव्हा तुला त्यांनी काय सांगितले होते? यावर श्रेयस अय्यर म्हणाला, “अर्थात त्यांनी मला खूप प्रेरित केले. सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की, भविष्याचा खूप विचार करू नको किंवा भूतकाळाचा देखील जास्त विचार करू नको. वर्तमानातील चालू गोष्टींवर लक्ष केंद्रित कर आणि फक्त येणाऱ्या चेंडूचा विचार कर.”
जेव्हा सुनील गावसकर यांनी अय्यरला गमतीत विचारले की, तू मी दिलेली कॅप का घातली नाही? तेव्हा अय्यर म्हणाला की, “ऊन असल्यामुळे मी कॅपऐवजी हॅट घालणे पसंत केले.” तसेच आपल्याला संघ प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून पदार्पणाची कॅप मिळण्याची अपेक्षा होती, असेही श्रेयस म्हणाला.
https://twitter.com/BCCI/status/1464196518542413824?s=20
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पाहुण्या संघाने वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्या ५ विकेट्सच्या जोरावर भारताचा डाव ३४५ धावांत संपुष्टात आणला. श्रेयस अय्यर आपल्या कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा १६ वा भारतीय फलंदाज ठरला. त्याने १०५ धावा केल्या. रविचंद्रन अश्विन वगळता खालच्या फळीतील फलंदाजांना न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. अश्विनने ५६ चेंडूत ३८ धावा केल्या. वेगवान गोलंदाजांना सकाळी खेळपट्टीवर अधिक उसळी मिळाली, त्यामुळे टीम साउदीने ४ विकेट घेतल्या. दुसरीकडे अश्विन आणि जडेजासारख्या फिरकीपटूंचे चेंडू वळत नव्हते.
विल यंग आणि लॅथम यांनी मिळून पाहुण्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी आपापली अर्धशतकं पूर्ण केली आणि दिवसाचा खेळ संपल्यानंतर नाबाद परतले. विल यंगने १८० चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने ७५ धावा केल्या आहेत. तर टॉम लॅथमने १६५ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या आहेत. भारतासाठी इशांत शर्माने ६ षटके टाकली आणि फक्त १० धावा दिल्या. त्याच्याशिवाय उमेश यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १० षटके टाकली, तर रविचंद्रन अश्विनने १७ आणि रवींद्र जडेजाने १४ षटके टाकली.
महत्त्वाच्या बातम्या-
आहा कडकच ना! पती शोएब मलिकसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार सानिया मिर्झा? व्हिडिओ व्हायरल
भारतीय फलंदाजांचा घाम काढणाऱ्या जेमिसनला उमेशने ठोकला उत्तुंग षटकार, व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस
VIDEO: ‘शतकवीर’ श्रेयसने मैदानाबाहेर जाताना केले असे काही, संघाकडून मिळाले मोठे स्टँडिंग ओव्हेशन





