आयपीएल इतिहासात सलग दोन सामन्यांत हिट विकेट होऊन बाद होणारा साई सुदर्शन पहिलाच फलंदाज आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्येही बॅट हातातून निसटून स्टम्पला लागल्याने दोन सामन्यांमध्ये दोनदा हिट विकेट होऊन बाद होणारा दुसरा कोणताही फलंदाज नसेल. आयपीएल 2026 च्या क्वालिफायर 1 मध्ये (26 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध आणि क्वालिफायर 2 मध्ये (29 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सुदर्शन हिट विकेट पद्धतीनेच बाद झाला. याबद्दल त्याने म्हटले की तो काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करेल, त्याचा संघसहकारी शुबमन गिलने मात्र त्याच्या हाताला टेप लावावा लागेल, असे म्हणत मजा घेतली.
आयपीएलच्या इतिहासात सलग दोनदा आणि एकूण तीनदा हिट विकेट बाद झालेल्या सुदर्शनला सामन्यानंतरच्या सादरीकरणात विचारण्यात आले की तो आता अहमदाबादमध्ये आपल्या ग्लोव्ह्जला गोंद/डिंक लावणार का, यावर तो म्हणाला, “मला वाटतं की मी काही गोष्टी करून बघायला हव्यात. मी आता काही ग्रिप टेक वापरून बघणार आहे आणि काही चेंडू खेळून बघेन आणि त्याचा अनुभव कसा येतो ते तपासेन. गेल्या सामन्यात तर चेंडू जमिनीवर काही वेळा टप्पा पडून मग स्टंप्सना जाऊन आदळला होता. पण या सामन्यात मात्र, मला वाटतं की, चेंडू थेट जाऊन स्टंप्सना भिडावा अशीच माझी इच्छा होती.”
क्वालिफायर २ मध्ये सुदर्शनची बॅट स्टम्पला लागलेली पाहून गिलही खचून गेला होता. तो सामन्यानंतर म्हणाला, ” मला वाटत नाही मी याआधी असे की पाहिलं असेल. सलग दोन वेळा ‘हिट विकेट’ झाल्याचे कुणीच पाहिले नसेल. मी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये हातांना टेप लावलेली होती; मला वाटते की, पुढच्या सामन्यात मलाही तसेच करावे लागेल.”
या आयपीएल हंगामात गिल-सुदर्शन जोडीने चांगली फलंदाजी करताना संघाला वेगवान सुरूवात करून दिली आहे, मात्र मागील दोन सामन्यात सुदर्शन ज्याप्रकारे बाद झाला ते पाहून गिलही नाराज दिसला. क्वालिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सने 215 धावसंख्येचे लक्ष्य दिले असताना गिलने शतकी खेळी करत संघाच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. दोघांनी या सामन्यात 167 धावांची भागीदारी केली. सुदर्शन 32 चेंडूंत 58 धावा आणि गिल 53 चेंडूंत 104 धावा करत बाद झाला. दोघांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे जीटीने 18.4 षटकांत 3 विकेट्स गमावत लक्ष्य गाठले आणि तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता अंतिम सामना 31 मे रोजी जीटी विरुद्ध आरसीबी असा होईल.






