भारत विरुद्ध इंग्लंडचा पहिला वनडे सामना काल (२३ मार्च) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात सफाईदार खेळ करत यजमान भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंडला ६६ धावांनी मात दिली. यासह तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.
मात्र या सामन्यात विजय मिळवला असला तरी एक वाईट बातमी देखील त्यांच्यासाठी समोर आली. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा फलंदाजी करतांना मार्क वूडचा चेंडू लागून दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे दुसर्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्याच्या जागी पर्यायी खेळाडू भारतीय संघाला शोधावा लागेल.
हाताच्या कोपराला झाली होती दुखापत
रोहित शर्माला फलंदाजी करतांना डावाच्या पाचव्या षटकांतच दुखापत झाली होती. वेगवान गोलंदाज मार्क वूडचा चेंडू त्याच्या हाताच्या कोपरावर येऊन लागला होता. त्यानंतर रोहितच्या हातातून रक्त देखील आले होते. मात्र तरीही रोहितने आपली खेळी पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर ४२ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. मात्र दुसर्या डावात तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी मात्र उतरला नाही. त्यामुळे त्याची दुखापत बळावली असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तो दुसरा सामना खेळणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.
शुभमन गिलला मिळू शकते संधी
रोहित शर्मा दुसर्या वनडे सामन्यातून बाहेर झाल्यास त्याच्या जागी शुभमन गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे. शुभमन गिल आत्तापर्यंत भारतासाठी तीन वनडे सामने खेळला असून यात त्याने १६.३३च्या सरासरीने ४९ धावा केल्या आहेत. त्याचा वनडेतील हा रेकॉर्ड समाधानकारक नसला, तरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने कसोटी मालिकेत दमदार प्रदर्शन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. त्यामुळे त्यालाच ही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीचा ‘हा’ खेळाडू अडकणार विवाह बंधनात, आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता
विराटच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय मांजरेकरांनी साधला निशाणा, म्हणाले….