भारत विरुद्ध इंग्लंड या बलाढ्य संघामध्ये येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी मिळाली आहे. तत्पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील मुख्य सलामीवीर फलंदाज शुबमन गिल हा गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे.
भारतीय संघासाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. या मालिकेत विराट कोहलीला आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी असणार आहे. तसेच ही विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील पहिलीच मालिका असणार आहे. अशातच भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल गंभीर जखमी झाला आहे. ज्यामुळे तो इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर होऊ शकतो. त्याच्याऐवजी अभिमन्यु ईश्वरनला संघात स्थान देण्यात येऊ शकते. अभिमन्यु ईश्वरनला राखीव खेळाडू म्हणून इंग्लंड दौऱ्यावर संधी देण्यात आली आहे. (Shubman gill may ruled out of India vs England test series)
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, “गिल संपूर्ण मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता आहे. मालिका सुरू व्हायला एक महिना शिल्लक आहे. परंतु त्याची दुखापत गंभीर आहे.”
असे म्हटले जात आहे की, त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत आहे. ज्यातून बाहेर यायला त्याला वेळ लागेल. त्याला दुखापत केव्हा झाली याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. या संघात केएल राहुल आणि मयंक अगरवाल सलामी फलंदाजी करण्यासाठी प्रतिक्षेत आहेत. तसेच गिलऐवजी संघात नवखा क्रिकेटपटू अभिमन्यु ईश्वरनलाही संधी देण्यात येऊ शकते.
शुबमन गिलची निराशाजनक कामगिरी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पदार्पण केलेल्या शुबमन गिलने आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. परंतु त्यांनतर तो आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. मायदेशात इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. या मालिकेत त्याने १९.८३ च्या सरासरीने ११९ धावा केल्या होत्या. त्यानंतर आयपीएल स्पर्धेतही तो फ्लॉप ठरला होता. नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील शुबमन गिलला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.
अभिमन्यु ईश्वरनची कामगिरी
शुबमन गिल ऐवजी संघात स्थान देण्यात येणाऱ्या अभिमन्यु ईश्वरनने पश्चिम बंगाल संघासाठी खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४३.५७ च्या सरासरीने ४४०१ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने १३ अर्धशतकेही केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दोन दशकांपूर्वी रॉबिन सिंगने केलेला ‘हा’ विक्रम अजूनही अबाधित, आता भुवीकडे पराक्रम करण्याची संधी
मिताली राजची एकाकी झुंज पुन्हा अपयशी; इंग्लंड महिलांनी दुसऱ्या वनडेतील विजयासह मालिकाही टाकली खिशात