भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा टेस्ट सामना (IND vs ENG 5th Test) 31 जुलै म्हणजेच उद्यापासून ‘द ओव्हल’ मैदानावर खेळवला जाणार आहे. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार शुबमन गिलने जसप्रीत बुमराहच्या खेळण्यापासून ते गौतम गंभीर आणि पिच क्युरेटर यांच्यात झालेल्या वादावादीवरही प्रतिक्रिया दिली. कर्णधार गिलने वॉशिंगटन सुंदरचे कौतुक केले आणि अर्शदीप सिंगला पाचव्या टेस्टसाठी तयार राहायला सांगितले असल्याचंही सांगितले. मात्र, अर्शदीप खेळणार की नाही याबाबत त्यांनी कोणतीही खात्री दिलेली नाही.
मंगळवारी ओव्हल मैदानावर गौतम गंभीर आणि तिथल्या पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात वाद झाला होता. यावर प्रतिक्रिया देताना कर्णधार शुबमन गिल म्हणाला, “मला माहित नाही तिथे नेमकं काय झाले आणि पिच क्युरेटरने जे काही केले, ते का केले. आम्ही इथे आधीच 4 सामने खेळले आहेत, पण कधीच कोणी आम्हाला थांबवलं नव्हतं. इथे भरपूर क्रिकेट खेळले गेले आहे, कर्णधार आणि प्रशिक्षक दोघेही अनेक वेळा पिचजवळ जाऊन पाहणी करत आलेत. त्यामुळे हे सगळे वाद का निर्माण झाले आहे, तेच मला कळत नाही.”
पाचव्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह खेळणार की नाही, यावर शुबमन गिलने सांगितले की त्याचा निर्णय उद्या घेतला जाईल. गिल म्हणाला की पिचवर भरपूर गवत आहे आणि सामन्याच्या वेळी हवामानाची स्थितीही बुमराह खेळणार की नाही, यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
एकीकडे जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाण्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे आपल्या पदार्पणाच्या टेस्टमध्ये प्रभावी कामगिरी न करता आलेल्या अंशुल कंबोजला बाहेर बसवले जाऊ शकते. अशा परिस्थितीत गोलंदाजीच्या संयोजनाबाबत गिल म्हणाला की, अर्शदीप सिंगला स्वतःची तयारी सुधारायला सांगितले आहे, पण अंतिम निर्णय पिचचे नीट मूल्यांकन केल्यानंतरच घेतला जाईल. इंग्लंडने आपल्या संघात एकही फिरकीपटू घेतलेला नाही, पण गिलला विश्वास आहे की रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर पुन्हा एकदा आपली फिरकीची जादू दाखवू शकतात.






