सोमवारचा (२३ ऑगस्ट) दिवस भारताचा सलामीवीर शुबमन गिल आणि झिम्बाब्वेचा विस्फोटक फलंदाज सिकंदर रझा यांनी गाजवला. या स्टार फलंदाजांनी धुव्वादार शतके केली. भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात हरारे येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्यांनी हे पराक्रम केले आहेत. शानदार शतकी खेळींनंतर या सामन्यात फार कमी वेळेस पाहायला मिळणारा प्रसंग घडला. भारताचा शतकवीर शुबमनने झिम्बाब्वेचा शतकवीर सिकंदरचा नेत्रदीपक झेल घेत त्याला बाद केले. हाच सामन्याचा टर्निंग पाँईन्ट ठरला.
भारताच्या २९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या संघाची गाडी रुळावरून घसरत होती. परंतु पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सिकंदरने (Sikandar Raza) सामना झिम्बाब्वेच्या बाजूने वळवला. त्याने भारतीय गोलंदाजांचा सामना करताना ९५ चेंडूत ११५ धावांची प्रशंसनीय खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १२१.०५ च्या स्ट्राईक रेटने ३ षटकार आणि ९ चौकार मारले. मात्र या शानदार खेळीनंतर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रझा झेलबाद झाला.
त्याने ४९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर लॉन्ग ऑनवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या गिलने त्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. शुबमनने वेगाने पुढे धावत येत डाईव्ह मारत अद्भुत (Shubman Gill’s Catch) झेल घेतला. त्याच्या चपळतेमुळे भारतीय संघाला मोठी विकेट मिळाली. गिलने घेतलेल्या या नेत्रदिपक झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Match winning catch by Shubmam Gill #ZIMvIND #INDvsZIM pic.twitter.com/OfAmWEPh2u
— Knull (@King_In__Black) August 22, 2022
रझा ज्यावेळी बाद झाला, त्यावेळी झिम्बाब्वेला विजयासाठी केवळ २० धावांची गरज होती. त्यामुळे गिलने घेतलेला हा झेल नक्कीच सामन्याचा कायापालट करणारा क्षण ठरला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर २८९ धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक १३० धावा फटकावल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ २७६ धावांपर्यंत मजल मारू शकला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने सर्वाधिक ११५ धावा जोडल्या.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्यांनी चांगली टक्कर दिली’, मालिका विजयानंतर भारतीय कर्णधाराने केलं प्रतिस्पर्धींच तोंडभरून कौतुक
ब्रेकिंग! टीम इंडियाला झटका, प्रशिक्षक द्रविड मोठ्या कारणामुळे आशिया चषकाला मुकणार?
पंजाब किंग्जमध्ये बदलाचे वारे! कोचनंतर आता कॅप्टन मयंकचीही होणार हकालपट्टी