आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी२० अशा तीन प्रकारातील क्रिकेट खेळले जाते. यातील टी२० क्रिकेटचे अनेकजण चाहते असतात. या क्रिकेटप्रकारात आपल्याला सर्वात वेगवान चौकार-षटकारांचा पाऊस पहायला मिळतो.
असे काही क्रिकेटपटू असतात ते जेव्हा मैदानावर येतात, तेव्हा चाहत्यांंना चौकार-षटकारांची तूफान खेळी पहायला मिळतेच. अशी कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) खूप पुढे आहे.
गेल टी२०क्रिकेटमध्ये (T20 Cricket) सर्वाधिक १००० षटकार ठोकण्याचा विक्रम करण्यापासून काही सामने दूर आहे. तसं पाहिलं तर गेल प्रत्येक ९व्या चेंडूनंतर षटकार मारतो. यामध्ये इतर दिग्गज क्रिकेटपटू आणि गेलच्या षटकारांमध्ये किती अंतर आहे, ते आपण या लेखात पाहणार आहोत.
जर २ देशांमध्ये होणाऱ्या टी२० सामन्यांबद्दल चर्चा करायची म्हटलं तर, भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला (Rohit Sharma) या क्रिकेट प्रकारातील ‘सिक्सर मशिन’ समजले जाते. रोहितने आतापर्यंत १९९८ चेंडू खेळताना सर्वाधिक १२७ षटकार ठोकले आहेत. या हिशोबाने पाहिले तर, रोहितने प्रत्येक १५.२७व्या चेंडूवर एक षटकार मारला आहे. परंतु षटकारांच्या यादीतील पहिल्या ४ फलंदाजांचे विक्रम पाहिले तर, दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड संघाचा फलंदाज मार्टिन गप्टीलने प्रत्येक १५.८३व्या चेंडूवर (१८८४ चेंडूत ११९ षटकार) षटकार मारला आहे.
तसेच तिसऱ्या क्रमांकावरील न्यूझीलंडचा कॉलिन मुन्रोने (Colin Munro) ११०२ चेंडूत १०७ षटकार मारले आहेत. तो १०.२९व्या चेंडूवर षटकार मारतो. मुनरो याबाबतीत गेलच्याही पुढे आहे. त्याने प्रत्येक १०.८४ व्या चेंडूवर (११३९ चेंडूवर १०५ षटकार) षटकार मारण्याचा कारनामा केला आहे.
टी२० क्रिकेटचा भाग असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये तर गेल एका राजाप्रमाणे आहे. त्याने एकूण २९६९ चेंडूत सर्वाधिक ३२६ षटकार ठोकले आहेत. या हिशोबाने त्याने ९.१० व्या चेंडूवर एक षटकार मारला आहे. गेलनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सचा (AB De Villiers) समावेश आहे. त्याने १३.७० व्या चेंडूवर (२९०६ चेंडूत २१२ षटकार) एक षटकार मारला आहे. म्हणजेच गेल आणि डिविलियर्स यांच्यात प्रत्येक चेंडूत षटकार मारण्यामध्ये ३ चेंडूचे अंतर आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ‘कॅप्टन कूल’ आणि ‘सुपर फिनिशर’ नावाने ओळखला जाणारा एमएस धोनी (MS Dhoni) आहे. त्याने १५.३८ व्या चेंडूवर एक षटकार मारला आहे. धोनीने आतापर्यंत ३२१५ चेंडू खेळताना २०९ षटकार मारले आहेत. तसेच रोहित या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितने १९.२९व्या चेंडूत एक षटकार मारला आहे. त्याने ३७४४ चेंडू खेळताना १९४ षटकार ठोकले आहेत.
जर, आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट लीगव्यतिरिक्त इतर टी२० लीग आणि देशांतर्गत स्पर्धांबद्दल बोलायचं झालं तर गेल यांमध्ये सर्वांच्या पुढे आहे. त्याने आतापर्यंत ९०४८ चेंडू खेळताना ९७८ षटकार ठोकले आहेत. त्याच्या तूफान खेळीमुळे आपल्या कारकीर्दीत त्याने ९.२५ व्या चेंडूत एक षटकार मारला आहे.
दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडीज संघाचाच खेळाडू केराॅन पोलार्ड (Kieron Pollard) आहे. त्याने ६६४१ चेंडू खेळताना ६५२ षटकार ठोकले आहेत. यामध्ये त्याने १०.१ व्या चेंडूवर षटकार मारला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणारा न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमने (Brendon McCullum) १४.९व्या चेंडूवर (७२६९ चेंंडूत ४८५ षटकार) षटकार मारला आहे. तसेच भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित तसं पाहिलं तर षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ४ थ्या क्रमांकावर आहे. परंतु त्याने ६४६३ चेंडूत ३६१ षटकार ठोकले आहेत. त्याने १७.९ व्या चेंडूत एक षटकार मारला आहे.
जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, गेलचा षटकार ठोकण्याचा वेग येथे मंदावलेला दिसतो. जागतिक क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक ३३१ षटकार ठोकण्यासाठी गेलने तब्बल १२०१९ चेंडूंचा सामना केला आहे. त्याने ३६.३१ व्या चेंडूत एक षटकार मारला आहे. तर सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर करणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) हा कारनामा १९.६३ व्या चेंडूवर (६८९२ चेंडूत ३५१ षटकार) षटकार मारत केला आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा फलंदाज सनथ जयसूर्याने (Sanath Jayasuriya) आपल्या कारकीर्दीत गोलंदाजांविरुद्ध चांगली फटकेबाजी केली आहे. परंतु त्याला आपल्या २७० षटकारांसाठी तब्बल १४७२५ चेंडूंचा सामना करावा लागला होता. या हिशोबाने जयसूर्याने सरासरी ५४.५३व्या चेंडूत एक षटकार मारला आहे.
सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या रोहितने ४२ व्या चेंडूवर एक षटकार मारला आहे. त्याने २४४ षटकार मारण्यासाठी तब्बल १०२५० चेंडूंचा सामना केला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-राजस्थान राॅयल्सची ऑल टाईम ११, दोन नावं आहेत आश्चर्यचकित करणारी
-भारतीय गोलंदाज मागायचे आमची माफी, आम्ही करायचो चांगली धुलाई