गुरुवारचा (दि. 02 नोव्हेंबर) दिवस 140 कोटी भारतीयांना आनंद देणारा ठरला. भारतीय क्रिकेट संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 33व्या आणि आपल्या सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, या विजयाचे अंतर खूपच मोठे होते. भारताने वानखेडे स्टेडिअम येथे पार पडलेल्या या सामन्यात श्रीलंकेला तब्बल 302 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह भारत या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ बनला. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा खूपच खुश झाला. त्याने खेळाडूंवर स्तुतीसुमने उधळली.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 357 धावा केल्या होत्या. या धावांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारताकडून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने 56 चेंडूत विस्फोटक 82 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. अय्यरच्या या खेळीचे रोहित शर्मा (Rohit Sharma) याने विशेष कौतुक केले.
काय म्हणाला रोहित?
रोहित म्हणाला, “जेव्हा तुम्हाला जास्त धावा करायच्या असतात, तेव्हा तुम्हाला अशाच प्रकारच्या खेळाची गरज असते. तसेच, कोणत्याही खेळपट्टीवर 350 धावांचे आव्हान खूपच चांगले आहे. याचे श्रेय फलंदाजी विभागाला जाते.” यावेळी अय्यरचे कौतुक करताना रोहित म्हणाला, “श्रेयस मजबूत (मानसिकरीत्या) खेळाडू आहे. तो क्रीझवर उतरला आणि त्याने अगदी तसेच केले, ज्यासाठी तो ओळखला जातो. आम्हालाही त्याच्याकडून हीच अपेक्षा आहे. श्रेयसने दाखवून दिले की, तो कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार आहे.”
गोलंदाजांच्या प्रदर्शनावर कर्णधार खुश
भारतीय गोलंदाजांनीही संपूर्ण स्पर्धेत शानदार प्रदर्शन दाखवले आहे. रोहित आपल्या गोलंदाजांच्या सर्व प्रकारच्या परिस्थितीत जबरदस्त प्रदर्शनाने खुश आहे. तो म्हणाला, “सिराज शानदार गोलंदाज आहे आणि तो जर नवीन चेंडूने असे करतो, तर आम्हाला गोष्टी वेगळ्या दिसतात. जेव्हा तो नवीन चेंडूने गोलंदाजी करतो, तेव्हा त्याचे कौशल्य शानदार आहे.”
रोहित असेही म्हणाला की, “इंग्लंडविरुद्ध आणि आज श्रीलंकेविरुद्ध सलग अशा प्रदर्शनावरून स्पष्ट दिसते की, आमच्यासाठी वेगवान गोलंदाजांचा स्तर कोणत्या प्रकारचा आहे. तसेच, परिस्थिती कोणतीही असो, ते खतरनाक आहेत. आशा करतो की, ते असे प्रदर्शन सुरू ठेवतील.”
भारतापुढे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान
पुढील सामन्याविषयी बोलताना रोहित म्हणाला, “दक्षिण आफ्रिका संघ खूपच चांगले क्रिकेट खेळत आहे आणि आम्हीही. प्रेक्षकांसाठी हा रंजक सामना असेल आणि कोलकाताचे चाहते याचा आनंद लुटतील.” भारतीय संघापुढे पुढील आव्हान दक्षिण आफ्रिकेचे आहे. हा सामना कोलकाता येथील इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. हा सामना रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. (skipper rohit sharma happy as team india becomes 1st team to reach semi final in world cup 2023)
हेही वाचा-
कॅप्टन असावा तर असा! खास शुज चाहत्याला केला भेट, विजयानंतर जिंकली लाखोंची मने
विजयाच्या सप्तपदीनंतर रोहितचे मोठे विधान, म्हणाला, “चेन्नईतून सुरुवात केली आणि आता…”