कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना गुरुवारी (२९ जुलै) आर प्रेमदासा स्टेडियमवर झाला. या सामन्यात श्रीलंकेने ७ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच ३ सामन्यांची ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चूकीचा ठरवत भारतीय फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करायला लावला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद ८१ धावा केल्या, तसेच श्रीलंकेसमोर ८२ धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान श्रीलंकेने १४.३ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.
श्रीलंकेकडून ८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीला अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका हे दोघे फलंदाजीसाठी उतरले. त्यांनी चांगली पण सावध सुरुवात केली होती. मात्र, ६ व्या षटकात फर्नांडो १२ धावांवर बाद झाला. त्याचा झेल राहुल चाहरने स्वत:च्याच गोलंदाजीवर घेतला.
त्याच्यानंतर ८ व्या षटकात मिनोद भानुका १८ धावांवर पायचीत झाला. तर, १२ व्या षटकात सदिरा समरविक्रमा ६ धावांवर त्रिफळाचीत झाला. या तिन्ही विकेट्स राहुल चाहरने घेतल्या. या तीन विकेट्स गेल्यानंतर सामन्यात काहीशी रंगत निर्माण झाली होती. मात्र, धनंजय डी सिल्वा आणि वनिंदू हसरंगा यांनी नंतर भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. तसेच संघाची धावसंख्या १५ व्या षटकापर्यंत ८२ वर पोहचवत सामन्यात विजय मिळवून दिला. धनंजय डी सिल्वा २० चेंडूत २३ धावांवर आणि वनिंदू हसरंगा ९ चेंडूत १४ धावांवर नाबाद राहिला.
भारतीय फलंदाजी गडगडली
भारताकडून कर्णधार शिखर धवनसह ऋतुराज गायकवाड सलामीला फलंदाजीला उतरला होता. मात्र, शिखर पहिल्याच षटकात शुन्यावर दुश्मंता चमिराच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल चौथ्या षटकात १५ चेंडूत ९ धावा करुन रमेश मेंडिसच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
यानंतर ५ व्या षटकात वनिंदू हसरंगाने भारताला दोन मोठे धक्के दिले. त्याने या षटकात चौथ्या चेंडूवर संजू सॅमसनला शुन्यावर बाद केले, तर अखेरच्या चेंडूवर ऋतुराजला १४ धावांवर पायचीत केले. श्रीलंकेचा कर्णधार दसून शनकाने ९ व्या षटकात १५ चेंडूत ६ धावा करणाऱ्या नितीश राणाला आपल्याच गोलंदाजीवर सुरेख झेल घेत माघारी धाडले. त्यामुळे भारताची अवस्था ९ षटकातच ५ बाद ३६ धावा अशी दयनीय झाली होती.
यानंतर उपकर्णधार भुवनेश्वरने कुलदीप यादवला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो देखील १५ व्या षटकात ३२ चेंडूत १६ धावा करुन वनिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यापुढच्याच षटकात दसून शनकाने राहुल चाहरला ५ धावांवर बाद केले. तसेत वरुण चक्रवर्तीही फार काही योगदान न देता शुन्यावर वनिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. अखेर कुलदीप यादवने चेतन साकारियाला साथीला घेत भारताला २० षटकांत ८१ धावांपर्यंत पोहचवले. कुलदीप २८ चेंडूत २३ धावांवर नाबाद राहिला, तर साकारिया ५ धावांवर नाबाद राहिला.
श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच दसून शनकाने २ विकेट्स, तर दुश्मंता चमिरा आणि रमेश मेंडिसने प्रत्येकी १ विकेट घेतली.
दोन्ही संघात १ बदल
तिसऱ्या सामन्यातून भारताकडून संदीप वॉरियर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. त्याला दुखापतग्रस्त नवदीप सैनीऐवजी अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे. तसेच श्रीलंका संघानेही अंतिम ११ जणांच्या संघात एक बदल केला आहे. श्रीलंकेच्या संघात इसरु उडाना ऐवजी पथम निसंकाला संधी मिळाली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
भारत: शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडीक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चाहर, संदीप वॉरियर, चेतन साकारिया, वरुण चक्रवर्ती.
श्रीलंका: अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (यष्टीरक्षक), सदिरा समरविक्रम, पथम निसंका, दसून शनाका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा, वनिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, अकिला धनंजया, दुश्मंता चमिरा.