चेम्सफर्ड। बुधवारी (१४ जुलै) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा आणि निर्णयक सामना पार पडला. हा सामना यजमान इंग्लंड संघाने जिंकून मालिका २-१ फरकाने जिंकली. असे असले तरी, तिसऱ्या टी२० सामन्यात भारताकडून ताबडतोड अर्धशतकी खेळी करणाऱ्या स्म्रीती मंधनाने २ खास विक्रमांना गवसणी घातली आहे.
स्म्रीतीचे तुफानी अर्धशतक
या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताने पहिल्याच षटकाय युवा फलंदाज शेफाली वर्माची शुन्यावर विकेट गमावली. त्यापाठोपाठ हरलीन देओलही ६ धावा करुन माघारी परतली. पण नंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या स्म्रीती मंधनाला साथ देण्यास सुरुवात केली. या दोघींनी ५२ चेंडूत ६८ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. पण ही भागीदारी रंगत असतानाच हरमनप्रीत ३६ धावांवर बाद झाली.
असे असले तरी मंधनाने एक बाजू संभाळून ठेवली होती. पण अखेर ती देखील १७ व्या षटकात कॅथरिन ब्रंटच्या गोलंदाजीवर नताली सिव्हरकडे झेल देऊन बाद झाली. पण, तिने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात मदत झाली. तिने ५१ चेंडूत ७० धावांची खेळी केली. या खेळीत तिने ८ चौकार आणि २ षटकार मारले.
तिच्या आणि हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त केवळ रिचा घोषला दोन आकडी धावसंख्या पार करता आली. रिचाने २० धावांची खेळी केली. २० षटकांअखेर भारतीय महिला संघाला ६ बाद १५३ धावा करता आल्या.
स्म्रतीने केले हे विक्रम
स्म्रीती मंधनाचे हे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील १३ वे अर्धशतक होते. तसेच तिने मायदेशाबाहेर खेळताना आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची ही ७ वी वेळ होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये मायदेशाबाहेर सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या महिला क्रिकेटपटूंच्या यादीत मंधना डान्ड्रा डॉटिन आणि मिताली राजला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
डॉटिन आणि मितालीने मायदेशाबाहेर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये प्रत्येकी ६ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर वेस्ट इंडिजची स्टिफानी टेलर आहे. तिने ९ वेळा मायदेशाबाहेर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
याबरोबरच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या चारही देशांमध्ये आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारी मंधना दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी असा पराक्रम टेलरनेच केला आहे.
इंग्लंडने जिंकला सामना
तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने दिलेल्या १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने २ विकेट्सच्या मोबदल्यात १८.४ षटकांत सहज पूर्ण केला. इंग्लंडकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या डॅनिएल वॅटने नाबाद अर्धशतकी खेळी करत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. तिने ५६ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारासह ८९ धावांची खेळी केली.
तिला नताली सिव्हरने ४२ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची शतकी भागीदारी रचली. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यात सहज विजय मिळवला आणि मालिकाही जिंकली. भारताकडून दीप्ती शर्मा आणि स्नेह राणाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –