सध्या कोरोना व्हायरस जागतिक महामारीमुळे जगभरात अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. याचा परिणाम भारतीय संघाच्या भविष्यातील क्रिकेट मालिका व आयपीएलवरही झाला आहे.
यातच काही दिवसांपुर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारतीय संघाला जुलै महिन्यात वनडे व टी२० मालिका खेळण्याचे निमंत्रण मेलने दिले आहे. परंतु सध्याची परिस्थीती पाहता भारतीय खेळाडू इनडोअर सरावाला प्राधान्य देण्याचे बोलले जात आहे.
“सध्याची परिस्थिती पाहता श्रीलंका दौरा अवघड दिसत आहे. आता एकावेळी एकच निर्णय घ्यावा लागणार आहे. आमचे अनेक खेळाडू मुंबई व बेंगलोर शहरात अडकले आहेत. हे दोन झोन कोरोनामुळे प्रचंड प्रमाणावर बाधीत झाले आहेत, ” असे एक अधिकारी टाईम्स नाऊशी बोलताना म्हणाला.
“भारतीय संघ कधीही विराट किंवा रोहित शिवाय सध्यातरी परदेशात सामने खेळणार नाही. सध्यातरी परदेशातील प्रवास कठीण आहे. आपल्याला गोष्टी पुढे कशा घडतात याची वाट पहावी लागणार आहे, ” असेही तो अधिकारी पुढे म्हणाला.