भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी२० मालिकेसाठी चांगलाच उत्साहित आहे. तो जवळपास दोन महिन्यांनंतर चाहत्यांसमोर आला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने युवा भारतीय खेळाडूची चक्क वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग व एमएस धोनी यांच्या सोबत तुलना केली.
मुलाखतीत केले युवा खेळाडूचे कौतुक
काही दिवसांपूर्वी आरोग्याच्या समस्यांमुळे गांगुली काही काळ दवाखान्यात होता. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर तो सार्वजनिक ठिकाणी मुलाखत देताना दिसला. एका जेष्ठ क्रीडा पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.
भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याचे कौतुक करताना तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाने साकारलेल्या ऐतिहासिक विजयामध्ये रिषभचे मोठे योगदान होते. ब्रिस्बेन कसोटीत त्याच्या खेळीमुळे भारतीय संघ विजय मिळवू शकला. इंग्लंडविरुद्ध देखील त्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याने भारताचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग सुकर झाला.”
भारतीय दिग्गजांशी केली तुलना
गांगुलीने पुढे बोलताना त्याची तुलना भारताच्या तीन दिग्गज खेळाडूंशी केली. गांगुलीने म्हटले, “तो एक मॅचविनर खेळाडू आहे. आपल्या दिवशी तो कोणत्याही परिस्थितीतून संघाला सामना जिंकून देऊ शकतो. माझ्या काळात मी वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग व एमएस धोनी यांनाच अशी कामगिरी करताना पाहिले आहे.”
पंतने गाजविल्या ऑस्ट्रेलिया व इंग्लंड विरुद्धच्या मालिका
रिषभ पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटी अनिर्णीत राखण्यात व ब्रिस्बेन कसोटी जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तर, इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यात सहा डावांमध्ये मिळून एक शतक व २ अर्धशतकांसह ५४ च्या सरासरीने २७० धावा फटकावल्या होत्या. जो रूट व रोहित शर्मा यांच्यानंतर सर्वाधिक धावा काढणारा तो तिसरा फलंदाज होता.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी२० सामन्यासाठी अशी ‘या’ ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी
“भारतीय खेळाडूंची तुलना पाकिस्तानी खेळाडूंसोबत करू शकत नाही, कारण पाकिस्तानकडे जास्त टॅलेंट आहे”
मायकेल वॉनने केलेल्या टीकेवर संतापला जोफ्रा आर्चर, तिखट प्रत्युतर देत म्हणाला..