आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (४ मार्च) पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत २० देशांनी सहभाग नोंदवला होता. आता चार संघ बाकी असून त्यातील आज एक संघ बाहेर पडणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एक संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सायंकाळी ७ वाजता रंगणार आहे.
दक्षिण आफ्रिका हा एक असा संघ आहे ज्याने या स्पर्धेच्या चालू हंगामात एकही सामना गमावलेला नाही, दुसरीकडे न्यूझीलंडने साखळी फेरीत एक आणि सुपर-८मध्ये एक सामना गमावला आहे. तसेच टी२० विश्वचषकात त्यांना दक्षिण आफ्रिकेने नेहमीच कडवे आव्हान दिले आहे. यामुळे आज कोण जिंकणार याचा रोमांच असणार आहे. त्यासाठी कोलकाताच्या खेळपट्टीचा अंदाज जाणून घेऊ.
नुकतेच या खेळपट्टीवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना खेळला गेला. हा सामना मोठ्या धावसंख्येचा झाला होता. यावरून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड सामनाही मोठ्या धावसंख्येचा होण्याची शक्यता आहे. या स्टेडियमवर आतापर्यंत १८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले गेले असून ९ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत आणि तेवढेच सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने.
येथे नाणेफेक जिंकणाऱ्या ११ संघांनी सामने जिंकले आहेत आणि हरणाऱ्या संघाने ७ सामने जिंकले आहेत. यामुळे नाणेफेक महत्वाची असणार आहे. तसेच येथे एकाही फलंदाजांने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये शतकी खेळी केली नाही. संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध केलेली नाबाद ९७ धावांची खेळी सर्वोच्च ठरली आहे.
कोलकातामधील सर्वात मोठी धावसंख्या, याच स्पर्धेत स्कॉटलंडने इटलीविरुद्ध ४ विकेट्स गमावत २०७ धावा केल्या होत्या. येथिल सर्वात कमी धावसंख्या २०१६मध्ये झाली होती. बांग्लादेशने न्यूझीलंडविरुद्ध ७० धावा केल्या होत्या.
आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम आणि न्यूझीलंडचा मिचेल सॅंटनर यांच्या नेतृत्वाची परिक्षाच असणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही टी२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावलेले नाही. यामुळे दोन्ही संघांचा आज सामना जिंकत अंतिम फेरीत पोहचण्याचे लक्ष्य असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेला २०२४मध्ये आणि न्यूझीलंडला २०२१मध्ये टी२० विश्वचषकाच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता यांच्यातच उपांत्य फेरीचा सामना होणार असल्याने एकाचे टी२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंग होणार आहे. तसेच टी२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध खेळलेले सर्व ५ सामने जिंकले आहेत.
या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला आहे. तसेच त्यांनी खेळलेल्या ७ पैकी ५ सामने अहमदाबादमध्ये खेळले आहेत. याबरोबरच दक्षिण आफ्रिकेने एकदाही ईडन गार्डन्सवर टी२० सामना खेळलेला नाही. ही सर्व स्थिती पाहता चाहत्यांना आज रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.






