fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आज टीम इंडियाकडून पदार्पण केलेल्या शहाबाज नदीमची अशी आहे कामगिरी

रांची। आजपासून (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु झाला आहे.

या सामन्यातून भारताकडून 30 वर्षीय शहाबाज नदीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तो भारताकडून कसोटीत पदार्पण करणारा 296 वा खेळाडू ठरला आहे.

या कसोटीतून कुलदीप यादव खांद्याच्या दुखापतीने बाहेर पडल्याने त्याची बदली खेळाडू नदीमची 15 जणांच्या भारतीय संघात काल(18 ऑक्टोबर) निवड करण्यात आली होती. त्यानंतर आज त्याची 11 जणांच्या भारतीय संघातही निवड झाली.

शाहबाज नदीमने देशांतर्गत क्रिकेट तसेच भारत अ संघाकडून चांगली कामगिरी केली आहे. त्याने डिसेंबर 2004 मध्ये झारखंडकडून केरळ विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

त्यानंतर आत्तापर्यंत त्याने 110 प्रथम श्रेणीचे सामने खेळताना 424 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने फलंदाजी करताना 2131 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे. तसेच त्याने 106 अ दर्जाच्या सामन्यात 145 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याचबरोबर त्याने 2015-16 च्या रणजी ट्रॉफी मोसमात 51 विकेट्स घेतल्या होत्या. तर त्याच्या पुढच्याच मोसमात त्याने 56 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. या दोन्ही मोसमात तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.

त्याचबरोबर त्याने जूलैमध्ये भारत अ संघाबरोबर केलेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यात 2 कसोटी सामन्यात 15 विकेट्सही घेतल्या होत्या. तो या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा गोलंदाजही होता.

तसेच त्यानंतर त्याने सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध भारत अ संघाकडून 4 दिवसीय सामन्यांची कसोटी मालिका खेळताना 2 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या. याबरोबरच त्याने याआधी याचवर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंड अ संघाविरुद्ध 2 कसोटी सामन्यात 7 विकेट्स घेतल्या होत्या.

नदीमने त्याच्या कारकिर्दीत आयपीएलमध्ये 64 सामने खेळताना 42 विकेट्सही घेतल्या आहेत.

You might also like