भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. मालिका विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला या सामन्यात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आले. श्रीलंका संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करत भारतीय संघाला 16 धावांनी पराभूत करण्यात यश मिळवले. यासह श्रीलंकेने तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशा बरोबरीत आणली. श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका हा सामन्याचा नायक ठरला.
2ND T20I. Sri Lanka Won by 16 Run(s) https://t.co/z85htccoA4 #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 5, 2023
श्रीलंका संघासाठी या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य होते. श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर कुसल मेंडीस आणि पथुम निसंका यांनी 8.2 षटकात 80 धावांची सलामी दिली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत श्रीलंकेला नियमित अंतराने धक्के दिले. मात्र, संघ अडचणीत असताना कर्णधार दसून शनाका याने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.
त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 22 चेंडूवर 56 धावा कुटल्या. यामध्ये दोन चौकार व सहा उत्तुंग षटकारांचा समावेश होता. कुसल मेंडीसने 31 चेंडूवर 52 तर असलंकाने 19 चेंडूवर 37 धावांची खेळी केली. भारतासाठी उमरान मलिकने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
विजयासाठी 207 धावांचे मोठे आव्हान घेऊन उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. भारताने कर्णधार हार्दिक पंड्यासह आपले 5 बळी केवळ 57 धावांमध्ये गमावले. मात्र, त्यानंतर सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल यांनी अक्षरशा श्रीलंकन गोलंदाजांची पिसे काढली. दोघांनी अवघ्या 6 षटकात 91 धावांची भागीदारी केली. अक्षरने 20 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमार अर्धशतकानंतर माघारी परतल्यावर शिवम मावी फलंदाजीला आला. त्याने आपण फलंदाजी करू शकतो हे दाखवत, मधुशंकावर हल्ला चढवला. त्याने दोन चौकार व दोन षटकार खेचले.
अखेरच्या षटकात भारताला जिंकण्यासाठी 21 धावांची गरज होती. विश्वचषकानंतर प्रथमच गोलंदाजी करताना श्रीलंकन कर्णधार शनाकाने 31 चेंडूवर 65 धावा करणाऱ्या अक्षरला बाद करत भारतीय संघाला पराभवाच्या खाईत लोटले. यासह श्रीलंकेने 16 धावांनी विजय मिळवत मालिका बरोबरीत आणली.
(Srilanka Beat India By 16 Runs In Pune T20I)