दक्षिण आफ्रिका संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांचा थरार पाहायला मिळणार आहे. दरम्यान ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना गुरुवारी (२ सप्टेंबर ) कोलंबोच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात श्रीलंका संघाने दक्षिण आफ्रिका संघावर १४ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.
श्रीलंका संघाला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत होते. परंतु, भारतीय संघाविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर या संघाने मागे वळून पाहिलेच नाही. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या पहिल्याच वनडे सामन्यात श्रीलंका संघातील गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत केले.
श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
यजमान श्रीलंका संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत श्रीलंकेच्या फलंदाजांनी ताबडतोड फलंदाजी केली. श्रीलंका संघाकडून सलामीवीर फलंदाज अविष्का फर्नांडोने शतकी खेळी करत सर्वाधिक ११८ धावांचे योगदान दिले. या खेळी दरम्यान त्याने २ षटकार आणि १० चौकार मारले होते.
तसेच चरिथ असलंकाने ६ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ७२ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाला ५० षटकांअखेर ९ बाद ३०० धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते.(Srilanka beat South Africa by 14 runs in first odi)
धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला आले अपयश
श्रीलंका संघाने दिलेल्या ३०१ धावांचा पाठलाग करताना जानेमन मलान आणि एडेन मार्करम यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु, मलानला मोठी खेळी खेळता आली नाही, तो अवघ्या २३ धावा करत माघारी परतला. तर एडेन मार्करमने ९६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ५ चौकार आणि ४ षटकार लगावले होते. त्यानंतर रस्सी वॅन दर डुसेनने ५९ धावांचे योगदान दिले होते. या खेळी दरम्यान त्याने ६ चौकार मारले होते.
शेवटी हेन्री क्लासनने ताबडतोड ३६ धावांची खेळी केली. परंतु, दक्षिण आफ्रिकन संघाला लक्ष्य पूर्ण करण्यासाठी १४ धावा कमी पडल्या. दक्षिण आफ्रिका संघाला ५० षटकांअखेर ६ बाद २८६ धावा करण्यात यश आले. या सामन्यात श्रीलंका संघाने १४ धावांनी विजय मिळवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
अजबच!! एकही वाईड, नो बॉल न टाकता देखील गोलंदाजाला टाकावे लागले ७ चेंडू, वाचा कारण
टोकियो पॅरालिम्पिक: ‘भारताची लेक’ अवनी लेखराने घडवला इतिहास, एकाच वर्षी जिंकली २ पदके
जडेजाला फलंदाजीत बढती देण्यामागे ‘अशी’ होती कर्णधार कोहलीची रणनिती, पण शेवटी झाली निराशा