श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजने शुक्रवारी कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण केल्या. कुमार संगकारा आणि महेला जयवर्धनेनंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा श्रीलंकेचा फलंदाज ठरला आहे. सेंट जॉर्ज पार्कवर श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मॅथ्यूजने ही कामगिरी केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी अँजेलोला आठ हजार धावा पूर्ण करण्यासाठी केवळ 34 धावांची गरज होती. 2009 मध्ये पदार्पण करणारा अँजेलो मॅथ्यूज श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक बनला आहे. मॅथ्यूजने गेल्या काही वर्षांत श्रीलंकेसाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही महत्त्वाचे योगदान दिले आहे. मॅथ्यूजने 226 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5916 धावा आणि 90 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1416 धावा केल्या आहेत.
रायन रिक्लेटन (101), कर्णधार टेम्बा बावुमा (78) आणि काइल वॉरेन (105) यांच्या झुंजार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 358 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने तीन विकेट गमावून 242 धावा केल्या आहेत.
पथुम निसांकाने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शानदार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या 358 धावांना प्रत्युत्तर देताना श्रीलंकेने तीन विकेट्सच्या मोबदल्यात 242 धावा करून आपली मजबूत स्थिती कायम राखली. निसांकाने 89 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याला दिनेश चंडिमल (44), अँजेलो मॅथ्यूज (नाबाद 40) आणि कामिंदू मेंडिस (नाबाद 30) यांची चांगली साथ लाभली.
श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात अजूनही 116 धावांनी मागे असून त्यांच्या सात विकेट शिल्लक आहेत. तत्पूर्वी, काइल वॉरनने नाबाद 105 धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 358 धावांवर नेली. दक्षिण आफ्रिकेने दिवसाची सुरुवात सात गड्यांच्या मोबदल्यात 269 धावांवरुन केली.
श्रीलंकेसाठी कसोटीत सर्वाधिक धावा
कुमार संगकारा – 134 सामन्यात 12400 धावा
महेला जयवर्धने – 149 सामन्यात 11814 धावा
अँजेलो मॅथ्यूज – 116 सामन्यात 8006 धावा
दिमुथ करुणारत्ने – 98 सामन्यात 7164 धावा
सनथ जयसूर्या – 110 सामन्यात 6973 धावा
अरविंदा डी सिल्वा – 93 सामन्यात 6361 धावा
दिनेश चंडीमल – 86 सामन्यात 5990 धावा
हेही वाचा-
संघाला धक्का..! दुस-या कसोटी दरम्यान संघाच्या प्रशिक्षकानं दिला राजीनामा
Under 19 Asia Cup: फायनलमध्ये भारत बांग्लादेश आमने-सामने, या दिवशी रंगणार महामुकाबला






